Friday, October 9, 2026
Homeआरोग्यइनरव्हील क्लब भुसावळचा ‘माझा शहर, स्वच्छ शहर’ उपक्रम

इनरव्हील क्लब भुसावळचा ‘माझा शहर, स्वच्छ शहर’ उपक्रम

इनरव्हील क्लब भुसावळचा ‘माझा शहर, स्वच्छ शहर’ उपक्रम

शिवमुद्रा चौकात जनजागृती फलक लावून नागरिकांना स्वच्छतेचे आवाहन

भुसावळ :   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी        शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी इनरव्हील क्लब भुसावळच्या वतीने ‘माझा शहर, स्वच्छ शहर’ हा उपक्रम राबविण्यात आला. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी गांधी जयंतीचे औचित्य साधून शिवमुद्रा चौकातील संतोषी माता हॉलजवळ हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी ‘उघड्यावर कचरा टाकू नका’ आणि ‘माझा शहर, स्वच्छ शहर’ असे जनजागृतीपर फलक लावण्यात आले.

या उपक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथी रजनी सवकारे यांच्या हस्ते करण्यात आली. त्यांनी परिसरातील नागरिकांना उघड्यावर कचरा न टाकता परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले. स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकानेही त्यात सहभागी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी नगरसेवक किरण कोलते, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष शिशिर जावळे आणि जय गणेश फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र यावलकर यांनीही नागरिकांशी संवाद साधत परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले. नागरिकांनी या वेळी परिसरातील स्वच्छतेसंदर्भातील समस्या मांडल्या.

प्रमुख अतिथी रजनी सवकारे यांनी केवळ हा परिसरच नव्हे, तर संपूर्ण भुसावळ शहर स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला. नगरसेवक किरण कोलते यांनी स्वच्छता उपक्रमाला पूर्ण सहकार्य करण्यासह परिसरात नियमित कचरा गाडी पाठविण्याचे आश्वासन दिले. शिशिर जावळे आणि राजेंद्र यावलकर यांनीही इनरव्हील क्लबच्या या उपक्रमाचे स्वागत केले.

इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सविता शुक्ला यांनी नागरिकांना परिसर स्वच्छ ठेवण्याबरोबरच पर्यावरणाचे रक्षण करण्याचे आवाहन केले. क्लबच्या माध्यमातून महिला आणि बालकांसाठी विविध उपक्रम राबविण्यासोबतच पर्यावरण संवर्धनासाठीही प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.शहरात स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी विविध सामाजिक संस्था आणि नागरिकांनी एकत्रितपणे पुढाकार घेण्याची गरज या उपक्रमातून अधोरेखित झाली.

यांची उपस्थिती
या उपक्रमाला इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सविता शुक्ला, सचिव वैशाली भगत, अॅडव्हायझर रजनी सवकारे, माजी अध्यक्षा किरण शुक्ला आणि सीसी पद्मजा दारगड उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या