होमगार्ड जवानांचा प्रामाणिकपणा ! हरवलेली पर्स, मोबाईलसह ५० हजार रुपये महिलेला परत
वरणगाव पथकातील तीन जवानांची कर्तव्यदक्षता; बोदवडमध्ये प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी वरणगाव ता भुसावळ :
कर्तव्य बजावताना दाखविलेली सतर्कता आणि प्रामाणिकपणामुळे वरणगाव पथकातील होमगार्ड जवानांनी समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. बोदवड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक परिसरात हरवलेली एका महिलेची पर्स, मोबाईल फोन आणि त्यामधील ५० हजार रुपयांची रोख रक्कम शोधून संबंधित महिलेला परत करण्यात आली. रविवार, ११ ऑक्टोबर रोजी घडलेल्या या घटनेमुळे होमगार्ड जवानांच्या कर्तव्यनिष्ठेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
बोदवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात कर्तव्यावर असलेले होमगार्ड अंमलदार विजय वाघचौरे,करण पाटील आणि शुभम सोनवणे यांनी या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावली. संबंधित महिलेची पर्स हरवल्याचे लक्षात आल्यानंतर जवानांनी तत्परतेने शोध घेण्यासाठी मदत केली.जवानांच्या प्रयत्नांमुळे पर्स, मोबाईल फोन आणि ५० हजार रुपयांची रोख रक्कम मिळवण्यात यश आले. त्यानंतर बोदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आशिष लवंगे आणि समादेशक अधिकारी प्रदीप बडगुजर यांच्या समक्ष संबंधित महिलेला तिच्या वस्तू व रोख रक्कम सुपूर्द करण्यात आली.
आजच्या काळात दुसऱ्याच्या हरवलेल्या वस्तू प्रामाणिकपणे परत मिळवून देणे ही समाजासाठी प्रेरणादायी बाब आहे. विजय वाघचौरे, करण पाटील आणि शुभम सोनवणे या जवानांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे पोलीस यंत्रणा व होमगार्ड दलाविषयी नागरिकांच्या मनातील विश्वास अधिक दृढ झाला आहे.या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तिन्ही होमगार्ड जवानांचे नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांची कर्तव्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणा इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

