Tuesday, October 13, 2026
Homeजळगावजळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मतदार यादीवरील हरकत फेटाळली . वंदना पाटील...

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मतदार यादीवरील हरकत फेटाळली . वंदना पाटील यांचे नाव कायम राहणार

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मतदार यादीवरील हरकत फेटाळली . वंदना पाटील यांचे नाव कायम राहणार

भुसावळ    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सन २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत वरणगाव एज्युकेशन सोसायटीच्या प्रतिनिधित्वावरून दाखल करण्यात आलेली हरकत जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा नाशिक विभागाचे विभागीय सहनिबंधक संभाजी निकम यांनी नामंजूर केली आहे. त्यामुळे प्रारूप मतदार यादीत श्रीमती वंदना भागवत पाटील यांचे नाव कायम ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
डॉ. गोविंद हरी चौधरी, विश्वस्त, दि वरणगाव एज्युकेशन सोसायटी, वरणगाव यांनी हरकत अर्ज क्रमांक ३४/२०२६ अन्वये ही हरकत दाखल केली होती. संस्थेच्या अधिकृत विश्वस्त मंडळाला संस्थेच्या कामकाजाचे अधिकार असल्याचा दावा करत त्यांनी बँकेच्या मतदार यादीतून वंदना भागवत पाटील यांचे नाव वगळून संस्थेचे प्रतिनिधी म्हणून डॉ. गोविंद चौधरी यांचे नाव समाविष्ट करण्याची मागणी केली होती.
या हरकतीच्या समर्थनार्थ अर्जदारांनी जळगाव जिल्हा न्यायालयाचा निकाल, धर्मादाय उपायुक्तांकडील निकाल तसेच संस्थेच्या परिशिष्ट-१ चा संदर्भ दिला होता. मात्र, संबंधित प्राधिकरणासमोरील सुनावणीवेळी पाटील यांचे नाव नोंदविण्यासाठी मंजूर केलेला ठराव सक्षम न्यायालयाने अवैध ठरविल्याचा ठोस कागदोपत्री पुरावा सादर करण्यात आला नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
सुनावणीत काय झाले?
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या २४ जून २०२६ रोजीच्या पत्रानुसार जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदार यादी अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याअंतर्गत दाखल हरकतीवर ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सुनावणी घेण्यात आली. अर्जदार सुनावणीवेळी गैरहजर होते; मात्र त्यांनी ई-मेलद्वारे लेखी म्हणणे सादर केले.
दरम्यान, प्रतिवादींकडून सादर करण्यात आलेल्या अभिप्रायानुसार, दि वरणगाव एज्युकेशन सोसायटी ही बँकेची स्थापनेपासूनची सभासद संस्था आहे. तसेच वंदना भागवत पाटील यांच्या अध्यक्षपदाला कोणत्याही न्यायालयाने स्थगिती किंवा मनाई आदेश दिलेला नसल्याचे आणि संस्थेचे सभासदत्व रद्द झालेले नसल्याचे त्यांच्या लेखी म्हणण्यात नमूद करण्यात आले.

संस्थेचे बँकेतील सभासदत्व कायम असताना वंदना भागवत पाटील यांचे नाव मतदार यादीतून वगळल्यास संस्थेला निवडणूक प्रक्रियेत प्रतिनिधी पाठविण्याच्या अधिकारापासून वंचित राहावे लागू शकते, असे निरीक्षण प्राधिकरणाने नोंदविले. त्यामुळे त्यांचे नाव प्रारूप मतदार यादीतून वगळणे न्यायोचित ठरणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र सहकारी संस्था (समिती निवडणूक) नियम २०१४ मधील नियम ११ (३) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करत जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक संभाजी निकम यांनी डॉ. गोविंद हरी चौधरी यांचा दावा व हरकत नामंजूर करण्याचा आदेश दिला.
या निर्णयामुळे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत वरणगाव एज्युकेशन सोसायटीच्या प्रतिनिधित्वाचा मुद्दा चर्चेत आला असून, मतदार यादी अंतिम करण्याच्या प्रक्रियेत या आदेशाला महत्त्व आहे .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या