वन्यजीव सप्ताहानिमित्त महात्मा गांधी विद्यालयात चित्रकला स्पर्धा उत्साहात
चार विद्यार्थिनींची निवड; विजेत्यांना प्रशस्तीपत्र व पारितोषिक देऊन गौरव
वरणगाव, खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी ता. भुसावळ : वन्यजीवांचे संरक्षण, संवर्धन आणि जैवविविधतेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने दरवर्षी १ ते ७ ऑक्टोबरदरम्यान वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो. या सप्ताहानिमित्त शाळांमध्ये चित्रकला, निबंध आणि वक्तृत्व अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. याच उपक्रमांतर्गत वरणगाव येथील महात्मा गांधी विद्यालयात चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आपली कलात्मक प्रतिभा सादर केली.
या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तीन विद्यार्थिनींची विजेत्या म्हणून, तर एका विद्यार्थिनीची उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी निवड करण्यात आली. यामध्ये प्रथम क्रमांक देवीका अमोल राणे, द्वितीय क्रमांक गायत्री अविनाश राणे, तृतीय क्रमांक सायली देवेंद्रकुमार फेगडे, तर उत्तेजनार्थ पारितोषिक रिद्धी विनोद पाटील हिला देण्यात आले.

वरणगाव एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा सौ. वंदनाताई पाटील यांच्या हस्ते तसेच वनरक्षक पी. सी. कुळकर्णी व श्री. विल्हाळे यांच्या तर्फे विद्यार्थिनींना प्रशस्तीपत्रे आणि पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य सी. जे. तायडे, पर्यवेक्षक पी. एस. झोपे, जी. ए. बागाईत यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षिका आणि विद्यार्थी उपस्थित होते.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीव संरक्षणाविषयी जागरूकता निर्माण होण्याबरोबरच त्यांच्या कलागुणांना वाव मिळाला. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थिनींचे विद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

