भुसावळात भूमी अभिलेख कार्यालयाचा शिपाई ACBच्या जाळ्यात!
शेतमोजणीतील त्रुटी दूर करण्यासाठी १ हजारांची लाच; सायबर कॅफे चालकासह दोघे ताब्यात !

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – शेतजमिनीच्या मोजणी अर्जातील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी एक हजार रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणात भुसावळ येथील भूमी अभिलेख कार्यालयातील शिपाई आणि त्याच्यासाठी लाचेची रक्कम स्वीकारणाऱ्या सायबर कॅफे चालकाला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ताब्यात घेतले. शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजून ३२ मिनिटांनी जामनेर रोडवरील नेहते हॉस्पिटलजवळ ही कारवाई करण्यात आली.
शेतमोजणीच्या अर्जात आढळल्या त्रुटी
या प्रकरणातील ३६ वर्षीय तक्रारदाराची भुसावळ तालुक्यातील गोजोरे शिवारात शेतजमीन आहे. या जमिनीच्या मोजणीसाठी त्यांनी ५ सप्टेंबर २०२६ रोजी भुसावळ येथील चव्हाण सायबर कॅफेमधून ऑनलाइन अर्ज केला होता. त्यासाठी दोन हजार रुपयांचे चलनही भरले होते. मात्र, ३० सप्टेंबर रोजी त्यांच्या अर्जात त्रुटी असल्याचा संदेश प्राप्त झाला.याबाबत तक्रारदाराने सायबर कॅफे चालक राकेश रामदास चव्हाण याच्याशी संपर्क साधला. त्यावेळी चव्हाण याने भूमी अभिलेख कार्यालयातील शिपाई सचिन किसन पाटील याच्याशी बोलणे झाल्याचे सांगून काम करून देण्याचे आश्वासन दिले.
एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी
१६ ऑक्टोबर रोजी सायबर कॅफे चालकाने तक्रारदाराला फोन करून शेतमोजणी अर्जातील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी शिपाई सचिन पाटील याच्यामार्फत एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने जळगाव ACB कार्यालयात धाव घेत तक्रार नोंदवली.
पंचांसमक्ष पडताळणी; सापळा रचून कारवाई
तक्रारीच्या अनुषंगाने ACB पथकाने पंचांसमक्ष पडताळणी केली. त्यात शिपाई सचिन पाटील याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याचे विभागाकडून सांगण्यात आले. त्यानंतर पथकाने सापळा रचला.
जामनेर रोडवरून हनुमान नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील नेहते हॉस्पिटलजवळ सायबर कॅफे चालक राकेश चव्हाण याने तक्रारदाराला शिपाई सचिन पाटील याच्यासाठी लाचेची रक्कम देण्यास प्रोत्साहित करून एक हजार रुपये स्वीकारल्याचा आरोप आहे. त्यानंतर ACB पथकाने दोघांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेले आरोपी
या कारवाईत सचिन किसन पाटील (वय ४५, शिपाई, उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, भुसावळ; रा. निवृत्तीनगर, मुक्ताईनगर) आणि राकेश रामदास चव्हाण (वय ४३, सायबर कॅफे चालक; रा. तापीनगर, भुसावळ) यांना ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे.
ACB पथकाची कारवाई
ही कारवाई सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पर्यवेक्षण पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी केले. पथकात पोलीस हवालदार किशोर महाजन, पोलीस कॉन्स्टेबल मनोज पाटील आणि प्रणेश ठाकूर यांचा समावेश होता.
पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राच्या अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
लाचेची मागणी झाल्यास १०६४ वर संपर्क साधा
कोणत्याही शासकीय कामासाठी लोकसेवक किंवा त्यांच्या वतीने अन्य कोणी लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे संपर्क साधावा किंवा टोल फ्री क्रमांक १०६४ वर तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी केले आहे.

