Tuesday, October 20, 2026
Homeजळगावदुर्गादेवी विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर भुसावळात पोलिसांचा रूट मार्च; सुव्यवस्थेसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त!

दुर्गादेवी विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर भुसावळात पोलिसांचा रूट मार्च; सुव्यवस्थेसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त!

दुर्गादेवी विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर भुसावळात पोलिसांचा रूट मार्च; सुव्यवस्थेसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त!

५० होमगार्डसह पोलीस अधिकारी व अंमलदारांचा सहभाग; विसर्जन मार्गाची पाहणी, शांततेत मिरवणूक पार पाडण्याचे आवाहन!

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – दुर्गादेवी विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवार, दि. १९ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५.१५ ते ६ वाजेदरम्यान पोलिसांतर्फे रूट मार्च काढण्यात आला. भुसावळ विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली हा रूट मार्च पार पडला. नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे आणि दुर्गादेवी विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडणे, हा या उपक्रमाचा उद्देश होता.

रूट मार्चची सुरुवात रजा टॉवर येथून करण्यात आली. त्यानंतर अमरदीप चौक, मच्छी गल्ली, नवीन पैलवान गल्ली, जामा मस्जिद, गांधी चौक, मॉडर्न रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि अमरदीप चौक या मार्गाने संचलन करत पुन्हा रजा टॉवर येथे रूट मार्चची सांगता करण्यात आली.या रूट मार्चमध्ये भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ, शहर वाहतूक शाखेचे राहुल भंडारे यांच्यासह अधिकारी व पोलीस अंमलदार सहभागी झाले होते. तसेच आरसीपी प्लाटून क्रमांक २, स्ट्रायकिंग फोर्स, पोलीस ठाण्यातील ३० पोलीस अंमलदार आणि भुसावळचे तालुका समादेशक सुरेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली ५० होमगार्ड सहभागी झाले होते.

मिरवणूक मार्गाची पाहणी; आवश्यक सूचना

दुर्गादेवी विसर्जनाच्या अनुषंगाने शहरातील संवेदनशील ठिकाणे आणि मुख्य मिरवणूक मार्गाची पाहणी करण्यात आली. विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, वाहतूक व सार्वजनिक सुव्यवस्था कायम राहावी आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी संबंधित अधिकारी व अंमलदारांना आवश्यक सूचना देऊन मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी जामा मस्जिद परिसरात पडदा झाकण्याबाबत नगरपालिका भुसावळचे वैभव पवार यांच्यासह पाहणी करून संबंधितांना आवश्यक सूचना व मार्गदर्शन करण्यात आले.दुर्गादेवी विसर्जन मिरवणूक शांततेत आणि सुरळीत पार पडावी, यासाठी पोलीस प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या