घोड्यावर स्वारी, गळ्यात भोपळ्याची माळ :
शेतकऱ्यांसाठी रासपचे अनोखे आंदोलन
जळगाव : खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, प्रलंबित पीकविमा दावे आणि नुकसानीच्या सर्वेक्षणातील त्रुटींविरोधात राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रभाकर साळवे यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. जामनेर तालुक्यातील कुंभारी गावापासून घोड्यावर स्वार होत त्यांनी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. गळ्यात भोपळ्याची माळ घालून शासनाचा निषेध नोंदवित त्यांनी शेतकऱ्यांना प्रति एकर २५ हजार रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी केली.
दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बियाणे, खते आणि कृषी निविष्ठांवर केलेली गुंतवणूक वाया गेली आहे. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने दिलासा द्यावा, अशी मागणी डॉ. साळवे यांनी केली.
नुकसानीचे फेरसर्वेक्षण करण्याची मागणी
शेतातील नुकसानीची नोंद करताना अनेक ठिकाणी त्रुटी राहिल्याचा आरोप करण्यात आला. काही शेतांमध्ये नुकसान होऊनही त्याची नोंद झाली नसल्याच्या, तर काही ठिकाणी प्रत्यक्ष नुकसानीपेक्षा कमी नुकसान दाखवण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करावी आणि फेरसर्वेक्षण करून बाधित शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
घोड्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत केलेली स्वारी आणि गळ्यातील भोपळ्याची माळ यामुळे डॉ. साळवे यांच्या आंदोलनाने लक्ष वेधून घेतले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न या आंदोलनातून करण्यात आला.

