चोपड्यात गावठी कट्टा आणि काडतुसे जप्त; २४ वर्षीय तरुण अटकेत !
चोपडा खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – चोपडा शहरातील धनवाडी रोडवरील ग्रामसेवक कॉलनी परिसरातील शशिकांत नगर येथे विनापरवाना गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या २४ वर्षीय तरुणाला चोपडा शहर पोलिसांनी अटक केली. १९ ऑक्टोबर रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत कारसह एकूण ८ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांना सार्वजनिक ठिकाणी एक व्यक्ती बेकायदेशीररीत्या अग्निशस्त्र बाळगून असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पंचांसमक्ष कारवाई करत जयेश दिलीप पाटील (वय २४, रा. सुरत, गुजरात) याची झडती घेतली.या झडतीत गावठी कट्टा, चार जिवंत काडतुसे, ९ एमएमची चार रिकामी काडतुसे, पाच मोबाईल फोन आणि सिमकार्ड आढळले. याशिवाय जीजे-०५ आरके-३१२७ क्रमांकाची पांढऱ्या रंगाची कारही जप्त करण्यात आली.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन रात्री आठ वाजेच्या सुमारास फॉरेन्सिक पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. पथकाने घटनास्थळावरून तांत्रिक पुरावे गोळा केले. संशयिताविरुद्ध यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी पुढील तपास करीत आहेत.दाट लोकवस्तीच्या शशिकांत नगर परिसरात झालेल्या या कारवाईमुळे नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

