श्री व्ही. एस. नाईक महाविद्यालय, रावेरची ॲथलेटिक्स स्पर्धेत बाजी!
*पुरुष व महिला दोन्ही गटांत प्रथम क्रमांक; जनरल चॅम्पियनशिपवरही मोहोर
रावेर तालुका खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
रावेर : परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री व्ही. एस. नाईक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, रावेरने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जळगाव विभागांतर्गत आयोजित आंतरमहाविद्यालयीन ॲथलेटिक्स स्पर्धा २०२६–२७ मध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. महाविद्यालयाने पुरुष व महिला दोन्ही गटांत प्रथम क्रमांक मिळवून जनरल चॅम्पियनशिप पटकाविली.
या स्पर्धेत पुरुष खेळाडू कृष्णा राठोड, यश पगारे, वेदांत जाधव, भावेश चौधरी आणि रवींद्र बारेला यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. महिला खेळाडू जानवी रोजुदे, तेजस्विनी ढाके, राधा नाईक, ममता सूर्यवंशी, हर्षा पवार, मानसी पाटील यांच्यासह इतर खेळाडूंनीही यशात मोलाचे योगदान दिले.
संस्थेचे अध्यक्ष हेमंतदादा नाईक यांच्याकडून अभिनंदन
परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. हेमंतदादा नाईक यांनी महाविद्यालयाच्या या अभिमानास्पद यशाबद्दल सर्व यशस्वी खेळाडूंचे, संघ व्यवस्थापकांचे, प्रशिक्षकांचे आणि शारीरिक शिक्षण विभागाचे मनःपूर्वक अभिनंदन केले. खेळाडूंनी आपल्या मेहनतीच्या जोरावर महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविला असून भविष्यातही विद्यापीठ, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अशीच उल्लेखनीय कामगिरी करावी, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
प्राचार्य नी केले खेळाडूंचे कौतुक
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील, यांनी पुरुष व महिला दोन्ही गटांतील खेळाडूंच्या यशाचे विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रालाही महत्त्व देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. खेळाडूंनी मिळविलेल्या या यशामुळे महाविद्यालयाची प्रतिष्ठा वाढली असून भविष्यातही विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्यासाठी प्रोत्साहन व मार्गदर्शन दिले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.महाविद्यालयाचा सर्व खेळाडूना विशेष अभिनंदन करून त्यानां पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या यशाबद्दल परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. हेमंतदादा नाईक, प्राचार्य डॉ. अनिल पाटील, उपप्राचार्य प्रा. एस. यू. पाटील, उपप्राचार्य डॉ. एच. डी. धापसे, आय क्यु ए सी सदस्य विजय महाजन,डॉ पी व्ही दलाल नॅक समन्वयक डॉ. बी. जी. मुख्यदल, क्रीडा संचालक डॉ. उमेश नारायण पाटील, क्रीडा समिती सदस्य प्रा. चतुर गाडे व प्रा. लालचंद वळवी, तसेच सर्व प्राध्यापकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
क्रीडा संचालक डॉ. उमेश नारायण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी केलेला नियमित सराव, मेहनत आणि शिस्त यांमुळे हे यश संपादन करता आले. पुरुष व महिला दोन्ही गटांत प्रथम क्रमांक आणि जनरल चॅम्पियनशिप मिळविणे ही महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब आहे.
श्री व्ही. एस. नाईक महाविद्यालय, रावेरच्या सर्व यशस्वी खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन!

