Thursday, October 22, 2026
Homeगुन्हादोन वर्षांपासून फरार; अखेर जबरी चोरीतील दोन आरोपी जेरबंद; जळगाव एलसीबीची धुळ्यात...

दोन वर्षांपासून फरार; अखेर जबरी चोरीतील दोन आरोपी जेरबंद; जळगाव एलसीबीची धुळ्यात कारवाई !

दोन वर्षांपासून फरार; अखेर जबरी चोरीतील दोन आरोपी जेरबंद; जळगाव एलसीबीची धुळ्यात कारवाई !

जळगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी     धरणगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यात मागील सुमारे दोन वर्षांपासून फरार असलेल्या दोन पाहिजे आरोपींना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धुळे जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. अजय भाईदास थोरात (वय २७, रा. नवलनगर, ता. जि. धुळे) आणि संभाजी बाळू पाटील (वय २६, रा. सातरने, ता. जि. धुळे) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी त्यांना धरणगाव पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

जळगाव जिल्ह्यात दाखल गुन्ह्यांतील पाहिजे व फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना विशेष पथके तयार करून फरार आरोपींचा शोध घेण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी अधिकारी व अंमलदारांचे विशेष पथक तयार केले. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी आवश्यक सूचना व मार्गदर्शन करून शोधमोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या.

दि. २१ ऑक्टोबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाला विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, धरणगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यातील दोन पाहिजे आरोपी धुळे जिल्ह्यात आहेत. धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४६०/२०२४ अन्वये भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ३०९(४) व ३(५) अंतर्गत हा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात अजय थोरात आणि संभाजी पाटील हे दोघेही मागील सुमारे दोन वर्षांपासून फरार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

मिळालेल्या माहितीच्या आधारे विशेष पथक तातडीने धुळे जिल्ह्यात रवाना झाले. गोपनीय माहितीच्या आधारे शोध घेतल्यानंतर पथकाने दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यानंतर पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी त्यांना धरणगाव पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, चाळीसगाव, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, चोपडा उपविभाग आणि स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार, पोलीस हेडकॉन्स्टेबल हरिलाल पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल विलेश सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल कोळी, पोलीस कॉन्स्टेबल विलास गायकवाड आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल महेश सोमवंशी यांचा समावेश होता.  जळगाव जिल्हा पोलीस दलाकडून पाहिजे व फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध प्रभावी कायदेशीर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम सातत्याने राबविण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या