जळगावात प्रवेशाच्या आमिषाने ७.२५ लाखांची फसवणूक !
बनावट गुणपत्रक देऊन विद्यार्थ्याची फसवणूक; धनादेशही बाऊन्स !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – बीएएमएस या वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून नशिराबाद येथील मोहित रमेशराव येवले (वय ३०) या तरुणाची ७ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जळगाव येथील अभिज्योत करिअर फार्मच्या संस्थापक मनीषा अजय जोशी आणि त्यांचे पती अजय जोशी यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहित येवले यांना नीट परीक्षेत चांगले गुण मिळाल्याने त्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा होता. यासाठी त्यांनी अभिज्योत करिअर फार्म येथे विचारणा केली असता, प्रवेशासाठी दहा लाख रुपये लागतील, असे सांगण्यात आल्याची माहिती फिर्यादीत नमूद आहे. त्यानुसार त्यांनी संबंधितांना वेळोवेळी आठ लाख रुपये दिले.यानंतर त्यांना भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ आयुर्वेद, पुणे या संस्थेच्या नावाचा बनावट शिक्का असलेले गुणपत्रक देण्यात आल्याचे समोर आले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मोहित येवले यांनी संबंधितांकडे पैसे परत मागितले. त्यावेळी त्यांना धनादेश देण्यात आले; मात्र हे धनादेश बँकेत वटले नाहीत. दरम्यान, त्यांना केवळ ७५ हजार रुपये परत मिळाले. उर्वरित रक्कम मिळत नसल्याने त्यांनी २० ऑक्टोबर रोजी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या तक्रारीच्या आधारे मनीषा जोशी आणि अजय जोशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

