थरारक घटना; अंगावर दुचाकीचा लाईट मारण्यावरून वाद; चॉपरने हल्ला, एकाचा मृत्यू !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – महिलांच्या अंगावर दुचाकीचा लाईट मारल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून दोघांवर चॉपरने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात किरण विठ्ठल पाटील (वय ४२, रा. माऊलीनगर) यांचा मृत्यू झाला, तर किशोर छगन पाटील (वय ४६) हे गंभीर जखमी झाले. ही घटना २० ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास खेडी बुद्रुक येथील माऊलीनगर परिसरात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित मयूर चैत्रराम जाधव याला अटक करण्यात आली आहे.
किशोर पाटील हे जळगाव शहरातील कालंका माता चौकात गॅरेज चालवतात. ते माऊलीनगर परिसरात वास्तव्यास असून, त्यांचे मित्र किरण पाटील हे त्यांच्या घराशेजारी राहत होते. किरण पाटील हे सुप्रीम कंपनीत नोकरीला होते.२० ऑक्टोबर रोजी रात्री परिसरात आरडाओरड सुरू असल्याचा आवाज आल्याने किरण पाटील यांनी बाहेर जाऊन पाहिले. त्यावेळी परिसरातील नागरिक आणि महिलांशी मयूर जाधव याचा वाद सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. किरण पाटील यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, मयूर जाधव हा बराच वेळ दुचाकीवर बसून महिलांच्या अंगावर लाईट मारत होता. याबाबत जाब विचारल्यानंतर त्याने शिवीगाळ करत वाद घातल्याचा आरोप आहे.
या वादातून संशयिताने किरण पाटील यांच्या छातीत चॉपरने वार केला. त्यांना वाचविण्यासाठी किशोर पाटील पुढे गेले असता, त्यांच्या छातीतही चॉपरने वार करण्यात आला. परिसरातील नागरिकांनी दोघांनाही तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी किरण पाटील यांना मृत घोषित केले. किशोर पाटील यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.हल्ल्यानंतर संशयित मयूर जाधव हा रोहित राजपूत आणि भरत सुतार यांच्यासह घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती आहे. एमआयडीसी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू करून तिघांना ताब्यात घेतले. किशोर पाटील यांच्या फिर्यादीवरून मयूर जाधव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.संशयिताला २१ ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला २६ ऑक्टोबरपर्यंत सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पुढील तपास उपनिरीक्षक कृष्णा पाटील करीत आहेत.
पोलिस पथकाची कामगिरी
पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, विजयसिंग पाटील आणि अन्य पोलिस कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

