रावेरमध्ये आनंद बाविस्कर यांचे अन्नत्याग आमरण उपोषण सुरू!
कंत्राटी कामगारांचे आर्थिक शोषण थांबविण्यासह ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञांची नियुक्ती करण्याची मागणी
रावेर, खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि. २६ ऑक्टोबर २०२६ : रावेर नगरपरिषदेत कार्यरत कंत्राटी कामगारांचे ठेकेदाराकडून होत असलेले कथित आर्थिक शोषण तसेच रावेर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या गर्भवती महिलांना भेडसावणाऱ्या आरोग्यविषयक अडचणींकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी निळे निशाण सामाजिक संघटनेचे संस्थापक तथा अध्यक्ष आनंद बाविस्कर यांनी सोमवार, दि. २६ ऑक्टोबर २०२६ पासून रावेर तहसीलदार कार्यालयासमोर अन्नत्याग आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
रावेर नगरपरिषदेतील कंत्राटी कामगारांचे आर्थिक शोषण करणाऱ्या संबंधित ठेकेदाराची चौकशी करून त्याला काळ्या यादीत टाकावे आणि त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. तसेच रावेर ग्रामीण रुग्णालयात गर्भवती महिलांना आवश्यक वैद्यकीय सेवा वेळेवर मिळाव्यात, यासाठी तातडीने स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करावी, अशीही मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
कंत्राटी कामगारांना न्याय मिळावा, त्यांचे आर्थिक शोषण थांबावे आणि गर्भवती महिलांना सुरक्षित व योग्य आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. संबंधित मागण्यांची शासन व प्रशासनाने तातडीने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, असे आवाहन आनंद बाविस्कर यांनी केले आहे.
आता या आंदोलनाची प्रशासन कितपत दखल घेते आणि संबंधित मागण्यांवर कोणती कार्यवाही करते, याकडे रावेरमधील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

