विरोधी गटाचा टी-पॉईंटवरील पुतळ्याचा आग्रह ; चर्चेनंतर डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम व्यापारी संकुलासमोरील जागेला मंजुरी
यावल खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – यावल शहरात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याच्या जागेवरून सोमवारी, दि. २६ ऑक्टोबर २०२६ रोजी नगरपालिकेच्या सभागृहात झालेल्या नगरसेवकांच्या सभेत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. सत्ताधारी गटाने निश्चित केलेल्या जागेबाबत विरोधी गटातील नगरसेवक राकेश कोलते व त्यांच्या सहकारी सदस्यांनी प्रारंभी भूमिका मांडत भुसावळ रोडवरील टी-पॉईंट येथे पुतळा उभारण्याची जोरदार मागणी केली.
मात्र, जागेच्या व्यवहार्यतेसह आवश्यक शासकीय परवानग्यांचा मुद्दा समोर आल्यानंतर आणि यावलकरांच्या भावनांचा विचार करून अखेरीस डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम व्यापारी संकुलासमोरील निश्चित जागेवर पुतळा उभारण्याचा विषय सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला.प्रभारी मुख्याधिकारी अभिजीत बाविस्कर यांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेतील चर्चेमुळे म्हणजे सभा सुरू असताना सभेतील विषय प्रसिद्धी माध्यमातून प्रसिद्ध झाल्याने शहरात आणि काही न.पा. सदस्यांमध्ये काही काळ संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. तथापि, चर्चेअंती पुतळा उभारण्यास विरोध नसल्याची भूमिका विरोधी गटाकडून स्पष्ट करण्यात आली आणि जागेबाबत सहमती निर्माण झाली.


