Thursday, November 5, 2026
Homeजळगावराज्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना दिली जाणार 'प्रदूषणमुक्त दिवाळी'ची शपथ !

राज्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना दिली जाणार ‘प्रदूषणमुक्त दिवाळी’ची शपथ !

राज्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना दिली जाणार ‘प्रदूषणमुक्त दिवाळी’ची शपथ !

यावल खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यंदा राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना ‘प्रदूषणमुक्त दिवाळी’ साजरी करण्याची शपथ देण्याचा महत्त्वाचा उपक्रम राबवण्यात येणार आहे.महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालयाने (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यासंदर्भातील अधिकृत पत्र जारी केले आहे.

काय आहे पार्श्वभूमी?
मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या ‘सुओ मोटो’ (Suo Motu) जनहित याचिका क्र. १/२०२६ च्या अनुषंगाने, न्यायालयाने १५ ऑक्टोबर २०२६ रोजी दिलेल्या आदेशानुसार विद्यार्थ्यांमध्ये धूर व पर्यावरणीय प्रदूषणबाबत जनजागृती करण्याचे निर्देश दिले होते. या पार्श्वभूमीवर, दिवाळीपूर्वी राज्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याबाबत शपथ देण्याचा उपक्रम आयोजित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

यासाठी शाळांच्या परिपाठाच्या वेळेचा उपयोग केला जाऊ शकतो.
शपथेचा मसुदा:

विद्यार्थ्यांना दिली जाणारी शपथ खालीलप्रमाणे आहे:
“दिवाळी हा आनंद उत्सव आहे आणि या आनंद उत्सवात सभोवतालचे पर्यावरण प्रदूषित होणार नाही. यासाठी आम्ही शपथ घेत आहोत. फटाक्यांमुळे हवा व ध्वनी प्रदूषण होते, ते आरोग्याला अपायकारक आहे याची आम्हाला जाणीव आहे. प्रदूषणामुळे लहान मुले, वृद्ध व्यक्ती, रुग्ण,पशु-पक्षी यांना खूप त्रास होतो. आम्ही आज सर्वजण संकल्प व निश्चय करतो की यावर्षीच्या दिवाळीत आम्ही फटाके वाजवणार नाही. तसेच आमचे मित्र मंडळी, नातेवाईक, कुटुंबीय यांना देखील फटाके न वाजवण्यासाठी प्रवृत्त करू. वर्षभरातील सर्व सण व उत्सव प्रदूषणमुक्त साजरे करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू, अशी शपथ मी घेत आहे.”

अधिकारी स्तरावर निर्देश:
उच्च न्यायालयाच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षण संचालनालयाने सर्व विभागांचे विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व जिल्ह्यांचे शिक्षण अधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) आणि बृहन्मुंबईचे शिक्षण निरीक्षक यांना तातडीने योग्य त्या सूचना जारी करण्यास सांगितले आहे. तसेच, आपापल्या विभागातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक आणि प्राचार्यांच्या निदर्शनास हे शासनाचे निर्देश आणून देऊन सर्व संबंधितांना या उपक्रमाबाबत सुकृत करण्याचे आदेश शिक्षण संचालक (डॉ. महेश पालकर) यांनी दिले आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या