दिवाळीच्या लख्ख प्रकाशात जळगावचे बालनिरीक्षण गृह न्हाले; संगीत मैफिलीने मुलांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद..!

जळगाव/ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
स्थानिक जिल्हा परिविक्षा आणि अनुरक्षण संघटना संचलित मुलांचे बालगृह आणि निरीक्षण गृह येथे दीपावलीनिमित्त एका अत्यंत सुंदर आणि भावुक करणाऱ्या संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र पोलिसांमधील नामवंत व प्रसिद्ध कलाकार संघपाल तायडे यांच्या ‘स्वरश्री पथक’तर्फे काल सायंकाळी हा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला. या सांगीतिक कार्यक्रमाने बालगृहातील मुलांची दिवाळी खऱ्या अर्थाने प्रकाशमय आणि आनंदमयी ठरली.
दिवाळीच्या पूर्वसंध्येला बालगृहाची इमारत आणि आतील संपूर्ण परिसर दिव्यांच्या लख्ख प्रकाशाने आणि आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता. संपूर्ण परिसरात एक चैतन्यमय आणि मांगल्याचे वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला बालगृहाचे अधीक्षक रविकिरण अहिरराव यांच्या हस्ते उपस्थित सर्व कलाकारांचे गुलाबपुष्प देऊन अत्यंत उत्साहात स्वागत करण्यात आले.
स्वरांच्या जादूने जिंकली मुलांची मने
या सांगीतिक मैफिलीमध्ये प्रसिद्ध गायक कलाकार संघपाल तायडे, मकरंद चौधरी , गायिका वर्षा चौधरी,विद्या भंगाळे, अजित भालेराव आणि प्रकाश सोनवणे या कलावंतांनी हजेरी लावली होती. या सर्व गुणी कलाकारांनी आपल्या गोड आवाजाच्या जादूने एकापेक्षा एक सरस गाणी सादर केली. कार्यक्रमात दिवाळी गीते, भक्तीगीते, भावगीते, देशभक्तीपर गीते तसेच लोकप्रिय मराठी व हिंदी गाण्यांचा नजराणा सादर करण्यात आला. या गाण्यांमुळे बालगृहातील मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झाला. संगीताच्या या सुरांनी मुलांना केवळ खिळवूनच ठेवले नाही, तर त्यांच्या मनात जीवन जगण्याची एक नवीन आशा आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण केली.जेष्ठ पत्रकार व कलावंत निवेदक यांनी उपस्थित मुलामुलींना तसेच सहकारी यांना दिवाळी या पवित्र पर्वाचे महत्व विषद केले. आणि जीवन जगताना सकारात्मक दृष्टीकोन नजरेसमोर ठेऊन आपण आपले जीवन व्यतीत करावे असे सांगितले
या संपूर्ण सुरेख कार्यक्रमाचे अतिशय सुंदर, नेटके आणि भावस्पर्शी सूत्रसंचालन श्री. तुषार वाघुळदे यांनी केले. त्यांच्या शैलीदार सूत्रसंचालनाने कार्यक्रमाची रंगत आणखीनच वाढवली.
‘स्वरश्री पथका’च्या या कौतुकास्पद सामाजिक उपक्रमामुळे बालगृहातील मुलांची यंदाची दिवाळी अत्यंत खास आणि स्मरणात राहणारी ठरली,अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.आभार अधीक्षक रविकिरण अहिरराव यांनी मानले.

