यावलच्या महाजन गल्ली विठ्ठल-रुक्माई मंदिरात दिवाळीनिमित्त महाकाकड आरती उत्साहात संपन्न; भाविकांची मोठी गर्दी!

यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि१२
संपूर्ण यावल परिसराचे श्रद्धास्थान असलेल्या यावल येथील महाजन गल्लीतील श्री विठ्ठल-रुक्माई मंदिराची स्थापना सन २०१३-१४ मध्ये झाली असून, मंदिराचे बांधकाम २०१८ मध्ये पूर्ण झाले. स्थापनेपासून ते आजपर्यंत या मंदिरात नियमितपणे विविध धार्मिक व अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
वर्षभर चालणारे धार्मिक उपक्रम
या मंदिरात आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी, महाशिवरात्री,तुलसी विवाह, भागवत सप्ताह पारायण,गीता पारायण तसेच दररोज संध्याकाळी नियमितपणे हरिपाठ सोहळा उत्साहात पार पडतो. विशेष म्हणजे, २०१८ पासून कार्तिकी महिन्यात ‘महाकाकडा’ (काकड आरती) सुरू करण्यात आला असून, दरवर्षी या काकड आरतीला भाविकांची दिवसेंदिवस वाढती गर्दी होत आहे.दिवाळीनिमित्त विशेष महाकाकड आरती आणि महाप्रसाद आज दिवाळीच्या शुभपवित्र निमित्ताने मंदिरात महाकाकड आरतीचे खास आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रगतशील शेतकरी प्रमोद यशवंत नेमाडे यांचे चिरंजीव स्वप्निल प्रमोद नेमाडे व सौ.मीनल स्वप्निल नेमाडे यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्माईचा विधिवत महाअभिषेक करण्यात आला. त्यानंतर महाकाकड आरती करण्यात आली.या धार्मिक सोहळ्यात यावल शहरातील व परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित देऊन विठूरायाच्या दर्शनाचा लाभ घेतला.आरतीनंतर उपस्थित सर्व भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
मंदिर समितीचे आवाहन
सध्या विठ्ठल मंदिर महाजन गल्ली येथे दररोज पांडुरंगाच्या नामाचा गजर दुमदुमत आहे. या पवित्र भक्तीमय वातावरणात नागरिकांनी आणि भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि महाकाकड आरतीचा व नामस्प्रणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर समितीतर्फे करण्यात आले आहे.

