Saturday, November 14, 2026
Homeजळगावआदिवासी समाजाच्या चार प्रमुख मागण्यांसाठी प्रतिभाताई शिंदे आक्रमक; मंत्री संजय सावकारेंना निवेदन

आदिवासी समाजाच्या चार प्रमुख मागण्यांसाठी प्रतिभाताई शिंदे आक्रमक; मंत्री संजय सावकारेंना निवेदन

आदिवासी समाजाच्या चार प्रमुख मागण्यांसाठी प्रतिभाताई शिंदे आक्रमक; मंत्री संजय सावकारेंना निवेदन
मुख्यमंत्र्यांपर्यंत आदिवासींच्या व्यथा पोहोचविण्याची मागणी; प्रत्यक्ष भेट आणि उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्याचे आवाहन

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                  वरणगाव ता भुसावळ :

महाराष्ट्रातील आदिवासी शेतकरी, शेतमजूर, भूमिहीन कुटुंबे आणि एकल महिलांच्या विविध प्रश्नांवर लोकसंघर्ष मोर्चाच्या संस्थापक अध्यक्ष प्रतिभाताई शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आदिवासी समुदायाच्या चार प्रमुख न्याय्य मागण्यांबाबत राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा भुसावळचे आमदार संजय सावकारे यांना निवेदन देण्यात आले असून, या मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत आदिवासी समाजाच्या भावना पोहोचविण्याची मागणी करण्यात आली आहे.

१४ नोव्हेंबर २०२६ रोजी दिलेल्या या निवेदनात मंत्री सावकारे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आदिवासी समाजाच्या प्रश्नांची गंभीरता निदर्शनास आणून द्यावी, तसेच मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय संबंधित मागण्यांवर ठोस निर्णय घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील आदिवासी शेतकरी, शेतमजूर, भूमिहीन कुटुंबे आणि एकल महिला सध्या दुष्काळ, आर्थिक असुरक्षितता आणि वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीतील प्रशासकीय अडचणींमुळे गंभीर परिस्थितीचा सामना करीत आहेत. शासनाने विविध योजना आणि निर्णय घेतले असले, तरी प्रभावी अंमलबजावणीअभावी अनेक पात्र आदिवासी कुटुंबे शासकीय लाभांपासून वंचित राहत आहेत.

यासाठी महसूल व वन विभागाचा २५ जानेवारी २०१९ चा शासन निर्णय, आदिवासी विकास विभागाचा ९ ऑक्टोबर २०२० चा खावटी अनुदान योजनेचा शासन निर्णय आणि वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीसंदर्भातील ११ नोव्हेंबर २०१६ च्या शासन आदेशाचा संदर्भ निवेदनात देण्यात आला आहे.

शासन निर्णय केवळ कागदावर न राहता त्यांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, पात्र लाभार्थ्यांना न्याय मिळावा आणि आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर धोरणात्मक निर्णय घ्यावेत, अशी भूमिका प्रतिभाताई शिंदे यांनी मांडली आहे.

लोकप्रतिनिधी म्हणून मंत्री संजय सावकारे यांनी आदिवासी समाजाच्या भावना आणि व्यथा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवून या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या