Saturday, November 14, 2026
Homeकृषीकुहे (पानाचे) येथे बलिप्रतिपदेला शेतकऱ्यांचा सन्मान; ‘पाणी आमच्या हक्काचे’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला!

कुहे (पानाचे) येथे बलिप्रतिपदेला शेतकऱ्यांचा सन्मान; ‘पाणी आमच्या हक्काचे’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला!

कुहे (पानाचे) येथे बलिप्रतिपदेला शेतकऱ्यांचा सन्मान; ‘पाणी आमच्या हक्काचे’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला!
शेतकरी पाणी हक्क समितीतर्फे पारंपरिक तळी उचलण्याचा कार्यक्रम; १८ कष्टकरी शेतकऱ्यांचा गौरव, सिंचनाच्या पाण्यासाठी एकजुटीचा निर्धार

भुसावळ      खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी     : बलिप्रतिपदेच्या मंगल पर्वाचे औचित्य साधून कुहे (पानाचे) येथे शेतकरी पाणी हक्क समितीच्या वतीने पारंपरिक तळी उचलण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित या सोहळ्यात ‘इडा-पिडा टळो, बळीचे राज्य येवो’, ‘पाणी आमच्या हक्काचे’ आणि ‘शेतकरी एकजुटीचा विजय असो’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. बळीराजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासोबतच शेतकऱ्यांचा सन्मान, सिंचनाच्या पाण्याचा हक्क आणि शेतकरी एकजुटीचा बुलंद संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आप्पासाहेब एकनाथराव बडगुजर होते. प्रमुख पाहुणे म्हणून जी. के. दादा पाटील, नथ्यू वराडे दादा, रविंद्र गांधेले, निवृत्ती बावस्कर आणि मधुकर सपकाळे उपस्थित होते.

१८ कष्टकरी शेतकऱ्यांचा सन्मान

या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे गावातील कष्टकरी शेतकऱ्यांचा रुमाल, टोपी आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. काळ्या आईची सेवा करून समाजाची अन्नसाखळी टिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या कष्टांचा सन्मान करण्याचा हा उपक्रम उपस्थितांच्या मनाला भावला. प्रभाकर कुंभार, सुरेश तेली, दिनकर सुतार, नामदेव वराडे, मुरलीधर भाई, प्रीतम पारधे, समाधान आठवले, रमेश बावस्कर, अशोक काळे, मोहन ताडे, गोकुळ कोळी, हिरा परदेशी, राजू बडगुजर, मानसिंग जाधव, यासीन मन्यार, अमोल बिल, दिनेश गांधेले आणि संतोष पारधी या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात काशिनाथ पाटील, जगण पाटील, संजय वराडे, संदीप महाजन, प्रकाश चौधरी, छगन वराडे, गोकुळ कोळी, प्रकाश उंबरकर आणि विलास चौधरी यांच्या हस्ते पारंपरिक तळी उचलून करण्यात आली. यावेळी सुधाकर बडगुजर यांनी तळी उचलण्याच्या परंपरेचे महत्त्व आणि शेतीसाठी पाण्याची गरज याविषयी मार्गदर्शन केले.

सिंचनाचे पाणी हा शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न!

प्रास्ताविकात विकास चौधरी यांनी बलिप्रतिपदेचे महत्त्व विशद करताना शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले. शेतकरी हा केवळ अन्नदाता नसून देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे त्याच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळण्याबरोबरच शेतीच्या प्रश्नांसाठी समाजाने एकजुटीने उभे राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

कुहे (पानाचे) परिसरातील शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. शेतीला वेळेवर आणि पुरेसे पाणी मिळाले, तर शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावू शकते. त्यामुळे तळी उचलण्याचा हा कार्यक्रम केवळ धार्मिक व पारंपरिक सोहळा न राहता शेतकऱ्यांच्या पाणी हक्काच्या लढ्याला बळ देणारा ठरला.

राजा बळी यांच्या समता, समृद्धी आणि लोककल्याणाच्या विचारांचे स्मरण करून शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. शेतकऱ्यांच्या घामाला प्रतिष्ठा, शेतीला हक्काचे पाणी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय खऱ्या अर्थाने बळीराजाचे राज्य साकार होणार नाही, असा संदेश या सोहळ्यातून देण्यात आला.

कार्यक्रमाला रविंद्र बोबडे, मधुकर पाटील, प्रवीण नागपुरे, शशिकांत वराडे, आण्णा गुरुजी, चंद्रकांत बावस्कर, विलास रंदाळे, एन. डी. पाटील, रमेश जाधव, कसदास जाधव, श्रीकांत बरकले, संजू शिंदे, गोपाल अस्वार, श्रीदत्त गुरु भजनी मंडळ, विनोद कोळी, राकेश बारी, एकनाथ पाटील, रमेश कोळी आणि बापू पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रमोद उंबरकर यांनी केले, तर आभार अरविंद बावस्कर यांनी मानले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या