सिद्धेश्वर नगरात जुन्या वादाचा भडका! दोन गटांत तुफान राडा; घरावर दगडफेक, वाहनांची तोडफोड अन् चाकूने हल्ला
लाठ्याकाठ्या घेऊन घरात घुसल्याचा आरोप; लोखंडी रॉडने डोक्यावर, चाकूने हातावर वार; दोन्ही गटांच्या परस्परविरोधी तक्रारींवरून गुन्हे दाखल

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी वरणगाव, ता. भुसावळ :
वरणगाव शहरातील सिद्धेश्वर नगर परिसरात जुन्या वादाने पुन्हा उग्र रूप धारण केले असून, दोन गटांमध्ये झालेल्या संघर्षामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घरावर दगडफेक, लाठ्याकाठ्यांनी हल्ला, वाहनांची तोडफोड, घरातील साहित्याचे नुकसान, तर दुसरीकडे लोखंडी रॉड आणि चाकूने हल्ला केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. १० नोव्हेंबरच्या रात्री घडलेल्या या घटनेने सिद्धेश्वर नगर हादरले असून, दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध पोलीस ठाण्यात धाव घेतल्याने परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.
रात्री साडेदहा वाजता घरावर हल्ला; कुटुंबात भीतीचे वातावरण
रुपाली अनिल इंगळे (वय ३८, रा. सिद्धेश्वर नगर) यांच्या फिर्यादीनुसार, रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास त्या पती व मुलांसह घरी असताना काही पुरुष आणि महिला आरडाओरड व शिवीगाळ करत त्यांच्या घराकडे आल्या. हातात लाठ्याकाठ्या घेऊन आलेल्या जमावाने घरावर दगडफेक सुरू केल्याचा आरोप आहे. त्यामुळे कुटुंबीयांनी जीवाच्या भीतीने घरात धाव घेतली.
त्यानंतर निलेश काळे, मुकेश काळे, नाना माळी, राजेंद्र माळी, सोनू उर्फ नाट्या राजपूत, राहुल राखुंडे, धीरज ठाकूर, सागर साबळे, आकाश साबळे, ताई कोळी, सोनी मुकेश काळे आणि निलेश काळे यांची आई अशा १२ जणांनी लाठ्याकाठ्यांसह घरात अनधिकृत प्रवेश केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घराच्या आवारातील चारचाकी व दुचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली, खिडक्यांच्या काचा फोडण्यात आल्या, तर घरातील साहित्याचेही नुकसान केल्याचा आरोप आहे.
मनोज कचुरे यांनाही मारहाण; जीवे मारण्याची धमकी
याच घटनेदरम्यान मीना विनोद कचुरे यांच्या घरी जाऊन त्यांचा मुलगा मनोज कचुरे याला लाठ्याकाठ्यांनी हातापायांवर मारहाण करून दुखापत केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दुसऱ्या गटाचीही पोलिसांत धाव; रॉड आणि चाकूने हल्ल्याचा आरोप
दरम्यान, दुसऱ्या बाजूने निलेश एकनाथ काळे (वय ३५, रा. सिद्धेश्वर नगर) यांनीही पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, रात्री साडेनऊच्या सुमारास वामननगरजवळ रेल्वे बोगद्याच्या आधी त्यांची मोटारसायकल अडविण्यात आली. आशू अनिल इंगळे, शांताराम भिल आणि सागर माळी या तिघांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे.
यावेळी आशू इंगळे याने डोक्यावर लोखंडी रॉडने मारहाण केली, शांताराम भिल याने चाकूने हातावर वार केला, तर सागर माळी याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यावेळी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
वरील घटनेचा तपास सपोनि अमित कुमार बागुल करीत आहे .

