भुसावळ बाजारपेठ सुरक्षा ऑडिट आणि भाडेकरूंच्या सक्तीच्या पोलीस पडताळणीसाठी प्रशासन सरसावले; गृह राज्यमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर एसपी कार्यालयाकडून तपासाचे निर्देश

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक भक्कम करण्यासाठी, सर्व व्यावसायिक व निवासी भाडेकरूंची सक्तीची पोलीस पडताळणी (Police Verification), ११ महिन्यांचा नोंदणीकृत भाडेकरार आणि भुसावळ बाजारपेठेतील सुरक्षा ऑडिट प्रक्रिया ‘फास्ट ट्रॅक’वर आणण्याच्या मागणीला मोठे प्रशासकीय यश मिळाले आहे. *’मालमत्ता हक्क संघाचे’ मुख्य संयोजक तथा शिवसेना (शिंदे गट) उत्तर महाराष्ट्र राजस्थानी विभागाचे अध्यक्ष प्रशांत सिंह ठाकूर* यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत प्रशासनाने प्रत्यक्ष कार्यवाहीचे पाऊल उचलले आहे.
या संदर्भात प्रशांत सिंह ठाकूर यांनी राज्याचे *गृह राज्य मंत्री (शहरे) मा. श्री. योगेश रामदास कदम* यांना सविस्तर निवेदन सादर करून जळगाव जिल्ह्यातील बाजारपेठांच्या सुरक्षेचा मुद्दा मांडला होता. या निवेदनाची गंभीर दखल घेत *मा. जिल्हाधिकारी (कलेक्टर), जळगाव* यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना (SP) तात्काळ चौकशी व कारवाईचे आदेश दिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार *पोलीस अधीक्षक कार्यालय, जळगाव (Application Branch)* यांनी आता *पोलीस निरीक्षक (PI), बाजारपेठ पोलीस स्टेशन, भुसावळ* आणि *पोलीस निरीक्षक, जिल्हा विशेष शाखा (DSB), जळगाव* यांना या प्रकरणी सखोल तपास व आवश्यक कार्यवाही करण्याचे अधिकृत निर्देश जारी केले आहेत.
*प्रशासनाकडे करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या आणि नियम:*
१. *अनिवार्य पोलीस पडताळणी व ११ महिन्यांचा करार:* भुसावळ शहरासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील व्यापारी बाजारपेठांमध्ये अनधिकृत हालचाली आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी सर्व भाडेकरूंची पोलीस पडताळणी आणि ११ महिन्यांचा नोंदणीकृत भाडेकरार सक्तीचा करण्यात यावा.
२. *बाजारपेठेचे फास्ट ट्रॅक सुरक्षा ऑडिट:* भुसावळच्या मुख्य बाजारपेठेतील संवेदनशीलता लक्षात घेता पोलीस प्रशासनामार्फत तात्काळ भौतिक सुरक्षा ऑडिट (Security Audit) पूर्ण करण्यात यावे.
३. *नियमबाह्य व्यवसाय बदलावर कारवाई:* मूळ मालकाच्या संमतीशिवाय (NOC) दुकानांचे व्यावसायिक स्वरूप बदलणे व शॉप ॲक्ट किंवा विकास नियंत्रण नियमावलीचा (DCR) भंग करणाऱ्यांवर प्रशासकीय पातळीवर कठोर कारवाई करण्यात यावी.
या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करताना *प्रशांत सिंह ठाकूर* म्हणाले की, *”गृह राज्यमंत्री मा. योगेश कदम साहेब, जिल्हाधिकारी महोदय आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाने जनहितार्थ घेतलेली ही तत्पर दखल स्वागतार्ह आहे. प्रशासनाच्या या कडक पावलांमुळे शहरातील व्यापारी वर्ग आणि प्रामाणिक मालमत्ता धारकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. सर्व घरमालक व दुकानदारांनीही आपल्या भाडेकरूंची पोलीस पडताळणी लवकरात लवकर पूर्ण करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे.”*

