दोन महिन्यांच्या संघर्षातून भुसावळ मुस्लिम समाजाचे जनाजा वाहन साकारले!
लोकवर्गणीतून २ लाख ४२ हजार रुपये जमा; पाच लाखांची गाडी मिळाली अवघ्या २ लाख २० हजारांत; रझा टॉवर चौकात दुआसह उद्घाटन

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी : कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर पार्थिव (मैय्यत) कब्रस्तानापर्यंत पोहोचविण्यासाठी वाहनाची व्यवस्था करताना नातेवाइकांची होणारी धावपळ आता थांबणार आहे. भुसावळ शहर मुस्लिम समाजाने लोकसहभागातून स्वतःचे जनाजा वाहन खरेदी केले असून, या सामाजिक उपक्रमाचा उद्घाटन सोहळा रझा टॉवर चौकात दुआ पठण करून उत्साहात पार पडला. दोन महिन्यांची मेहनत, सहकाऱ्यांची एकजूट आणि शहरवासीयांच्या आर्थिक सहकार्यातून हा उपक्रम प्रत्यक्षात साकार झाला आहे.
अडचणीतून जन्माला आली स्वतःच्या वाहनाची संकल्पना
या उपक्रमाची सविस्तर माहिती देताना सद्दाम हुसेन खाटीक यांनी सांगितले की, यापूर्वी इलियास सर यांनी हज यात्रेला जाण्यापूर्वी रझा टॉवर ग्रुपला पिवळ्या रंगाची गाडी उपलब्ध करून दिली होती. मात्र, हजवरून परतल्यानंतर त्यांनी काही कामे करायची असल्याचे सांगून गाडी परत नेली. त्यानंतर गाडीबाबत विचारणा केली असता, त्यावर कायमस्वरूपी चालक ठेवून ती चालविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच गाडीवर सद्दाम खाटीक व त्यांच्या सहकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक टाकण्याबाबतही आक्षेप घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रसंगामुळे निराश न होता सद्दाम खाटीक यांनी समाजासाठी कायमस्वरूपी स्वतःचे वाहन असावे, असा निर्धार केला. त्यांना सईद ड्रायव्हर, मोहसिन काझी, फारूक आटा, जुनैद खान, बब्बू भाई सलमान, रमजान गवळी, नवीद भाई, शोएब भाई, समीर भाई, शाकीर पिंजारी आणि अन्वर अण्णा यांनी साथ दिली. सर्वांनी मिळून भुसावळ शहर मुस्लिम समाजाच्या नावाने स्वतंत्र जनाजा वाहन खरेदी करण्याचा निर्णय घेतला.
दोन महिन्यांत २ लाख ४२ हजारांची लोकवर्गणी
त्यानंतर शहरातील जबाबदार व्यक्ती, दानशूर नागरिक आणि समाजबांधवांकडून आर्थिक सहकार्य गोळा करण्यास सुरुवात झाली. जवळपास दोन महिन्यांच्या प्रयत्नांतून २ लाख ४२ हजार रुपये जमा झाले. वाहनाचा शोध घेत असताना जलगाव येथे शकील भाई यांच्याकडे सुमारे पाच लाख रुपये किमतीची गाडी उपलब्ध झाली. मात्र, समाजाच्या या सेवाभावी उपक्रमाची भावना लक्षात घेऊन त्यांनी ही गाडी अवघ्या २ लाख २० हजार रुपयांत देऊन मोलाचे सहकार्य केले.
दुरुस्तीवर १९ हजार ४३५ रुपये खर्च
गाडी खरेदी केल्यानंतर ती सुस्थितीत आणण्यासाठी वायरिंग, डिझेल ऑईल, इंजिन ऑईल, डेंटिंग, पेंटिंग, लाईट फिटिंग, रेडियम यासह आवश्यक कामांवर १९ हजार ४३५ रुपये खर्च करण्यात आले. सर्व खर्चानंतर ३ हजार ३१५ रुपये शिल्लक असून, ही रक्कम नवीन बॅटरी खरेदीसाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती सद्दाम हुसेन खाटीक यांनी दिली. या उपक्रमासाठी आर्थिक मदत करणाऱ्या सर्व देणगीदारांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.
संपूर्ण समाजाची सामूहिक अमानत
हे वाहन कोणत्याही एका व्यक्तीचे नसून संपूर्ण भुसावळ शहर मुस्लिम समाजाची सामूहिक अमानत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. मुस्लिम कॉलनी, कंडारी, चाळी, झेड.टी.एस., साकरी, फेकरी यांसह शहरातील विविध भागांतील नागरिकांना आता मैय्यत कब्रस्तानापर्यंत पोहोचविण्यासाठी या वाहनाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
समाजातील दुःखाच्या प्रसंगी कुटुंबीयांची होणारी धावपळ कमी व्हावी, त्यांना वाहनासाठी इतरांवर अवलंबून राहावे लागू नये, या उदात्त हेतूने उभारलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. एका व्यक्तीच्या अडचणीतून निर्माण झालेली कल्पना आज संपूर्ण समाजाच्या सेवेसाठी उपलब्ध झाली आहे. लोकसहभाग, एकजूट आणि सेवाभाव यांच्या बळावर भुसावळ मुस्लिम समाजाने माणुसकीचा आदर्श निर्माण केला आहे.

