चाळीसगावातील शिवनेरी हॉटेलचे शटर तोडून २७ हजारांची रोकड लंपास

सीसीटीव्हीत कैद झाला अज्ञात चोरटा मध्यरात्री २.३२ ते २.५९ वाजेदरम्यान चोरीची घटना
चाळीसगाव : खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी शहरातील घाटरोड परिसरातील शिवनेरी हॉटेलला लक्ष्य करत अज्ञात चोरट्याने शटरचे कुलूप तोडून हॉटेलमध्ये प्रवेश केला आणि काउंटरच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली २७ हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी १९ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री २.३२ ते २.५९ वाजेच्या दरम्यान घडली. हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरीची घटना कैद झाली असून, याप्रकरणी हॉटेलचालक चेतन दत्तात्रय चौधरी यांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एम.जी. नगर येथील रहिवासी चेतन दत्तात्रय चौधरी यांचे घाटरोड परिसरात शिवनेरी हॉटेल आहे. १८ नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास त्यांचे वडील दत्तात्रय चौधरी यांनी नेहमीप्रमाणे हॉटेल बंद करून शटरला कुलूप लावले आणि घरी गेले होते. दरम्यान, १९ नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजता चेतन चौधरी हे हॉटेल उघडण्यासाठी गेले असता शटरला कुलूप दिसून आले नाही.याबाबत त्यांनी वडिलांना फोन करून विचारणा केली असता, रात्री हॉटेल बंद करताना कुलूप लावल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर हॉटेलमधील कारागीर योगेश पाटील यांना बोलावून घेतले. हॉटेलमध्ये प्रवेश केल्यानंतर आतील कागदपत्रे, चेकबुक व इतर साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. तसेच काउंटरचे ड्रॉवर उघडे असून त्यातील रोख रक्कम गायब असल्याचे निदर्शनास आले.वडील दत्तात्रय चौधरी यांनी व्यापारासाठी देण्याकरिता रात्री काउंटरच्या ड्रॉवरमध्ये २७ हजार रुपये ठेवले होते. मात्र, ही संपूर्ण रक्कम चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यावेळी रात्री २.३२ ते २.५९ वाजेदरम्यान जॅकेट परिधान केलेला व चेहऱ्यावर रुमाल बांधलेला एक अज्ञात इसम हॉटेलमध्ये प्रवेश करून चोरी करताना दिसून आला.चोरट्याने २६ हजार २०० रुपये किमतीच्या १००, २०० व ५०० रुपयांच्या नोटा, तसेच ८०० रुपयांची १०, ५, २ व १ रुपयांची चिल्लर, अशी एकूण २७ हजार रुपयांची रोकड चोरून नेली.याप्रकरणी चेतन दत्तात्रय चौधरी यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे

