५० लाखांच्या विम्यासाठी मृत्यूचा बनाव! चार बडतर्फ पोलिसांसह १० जणांवर गुन्हा दाखल !

चाळीसगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – विमा कंपनीकडून तब्बल ५० लाख रुपयांची रक्कम मिळवण्यासाठी बनावट अपघाताचा बनाव रचून मृत्यूचे खोटे प्रकरण उभे करणाऱ्या टोळीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आलेले चार पोलीस अंमलदार, एक वैद्यकीय अधिकारी आणि खासगी एजंटसह एकूण १० जणांविरुद्ध मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, मृत व्यक्तीच्या नावावरील डेबिट कार्डचा गैरवापर करून १० लाख रुपये काढल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे.
बनावट अपघाताचा बनाव रचून ५० लाखांचा विमा दावा!
चाळीसगाव तालुक्यातील जामदा शिवारात ९ जून २०२५ रोजी एका व्यक्तीचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्याचा बनावट प्रकार उभा करण्यात आला होता. आरोपींनी संगनमत करून खोटे साक्षीदार तयार केले आणि संबंधित व्यक्तीचा मृत्यू अपघातात झाल्याचे भासवले. या आधारे मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून विमा कंपनीकडे तब्बल ५० लाख रुपयांचा विमा दावा सादर करण्यात आला होता.मात्र, विमा कंपनीकडून दाव्याची शहानिशा आणि चौकशी सुरू होताच हा विमा दावा मागे घेण्यात आला. दरम्यान, मृत व्यक्तीच्या नावावरील डेबिट कार्डचा गैरवापर करून १० लाख रुपये काढण्यात आल्याचा प्रकार तपासात समोर आला.
चार बडतर्फ पोलीसांसह दहा जणांवर गुन्हा
या गंभीर प्रकरणाची चौकशी चाळीसगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्याकडे सोपविण्यात आली होती. चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यातील निष्कर्षांच्या आधारे गुन्हा दाखल करण्यास परवानगी देण्यात आली. त्यानुसार १९ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.२८ वाजता मेहुणबारे पोलीस ठाण्यात चार बडतर्फ पोलीस अंमलदार, एक वैद्यकीय अधिकारी आणि खासगी एजंटसह एकूण १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
बडतर्फ पोलिसांची कारकीर्द पुन्हा चर्चेत!
या प्रकरणातील चार पोलीस अंमलदार यापूर्वीही अशाच प्रकारच्या विमा फसवणुकीच्या गुन्ह्यात अडकले असून, ते सध्या कारागृहात असल्याची माहिती आहे. त्यांच्या गंभीर कृत्यांमुळे पोलीस प्रशासनाने त्यांना यापूर्वीच सेवेतून बडतर्फ केले आहे. मात्र, आता पुन्हा त्यांच्या जुन्या कारनाम्यांशी संबंधित गंभीर प्रकरण समोर आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.पुढील तपास परिविक्षाधीन उपअधीक्षकांकडे या प्रकरणाचा पुढील तपास मेहुणबारे पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी तथा परिविक्षाधीन उपअधीक्षक सह्याद्री बिर्ले करीत आहेत. विमा फसवणुकीच्या या कथित कटामागील नेमके सूत्रधार कोण, बनावट अपघातासाठी कोणाची मदत घेण्यात आली आणि डेबिट कार्डद्वारे काढलेल्या १० लाख रुपयांचा पुढे काय वापर झाला, याचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे.

