Saturday, November 21, 2026
Homeजळगावतोतया पोलिसांचा धुमाकूळ! मका व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रयत्न; पोलीस कार्ड दाखवून अंगठ्या काढण्याचा...

तोतया पोलिसांचा धुमाकूळ! मका व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रयत्न; पोलीस कार्ड दाखवून अंगठ्या काढण्याचा दबाव!

तोतया पोलिसांचा धुमाकूळ! मका व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रयत्न; पोलीस कार्ड दाखवून अंगठ्या काढण्याचा दबाव!

बोदवड खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहरात पोलीस असल्याचे भासवून मका व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना गुरुवार, दि. २० नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ४:२० वाजेच्या सुमारास घडली. दोन मोटारसायकलींवरून आलेल्या तीन अनोळखी व्यक्तींनी व्यापाऱ्याला रस्त्यात अडवून त्याच्याकडील सोन्याच्या अंगठ्या काढण्यास सांगितले. मात्र, व्यापाऱ्याने प्रसंगावधान राखत मोबाईल बाहेर काढताच तिघांनी घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकारामुळे बोदवडमधील व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बोदवड येथील मका व्यापारी रतनसिंग पाटील हे मनूर रोडवरील आपल्या मका खरेदी केंद्रावरून बोदवड गावाकडे येत होते. दरम्यान, जामठी रोडवरील बळीराजा मंगल कार्यालयाजवळ दोन मोटारसायकलींवरून आलेल्या तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांना रस्त्याच्या कडेला थांबवले.यानंतर संबंधित तिघांनी पाटील यांच्या बॅगेत काय आहे, अशी विचारणा केली. त्यातील एका व्यक्तीने पोलीस गणवेशाचे छायाचित्र असलेले कार्ड दाखवून आपण पोलीस असल्याचा आभास निर्माण केला. तर दुसऱ्या व्यक्तीने पाटील यांच्या हातातील सोन्याच्या अंगठ्या काढून खिशात ठेवण्यास वारंवार दबाव टाकल्याची माहिती समोर आली आहे.विशेष म्हणजे, या तिघांना मराठी बोलता येत नव्हते. ते हिंदी बोलत असताना त्यांच्याकडून वेगळी भाषाही बोलली जात असल्याचे व्यापाऱ्याने सांगितले. त्यामुळे या संशयित व्यक्ती नेमक्या कोण होत्या, याबाबत अधिकच प्रश्न निर्माण झाले आहेत.मात्र, रतनसिंग पाटील यांनी घाबरून न जाता प्रसंगावधान राखले. त्यांनी मोबाईल फोन बाहेर काढताच संबंधित तिन्ही व्यक्तींनी मोटारसायकलींवरून घटनास्थळावरून पळ काढला. त्यामुळे संभाव्य लुटीचा प्रयत्न फसला.

नव्याने रुजू झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांसमोर पहिलेच आव्हान!

बोदवड पोलीस स्टेशनमध्ये नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक राळेभात यांच्यासमोर या घटनेमुळे पहिलेच महत्त्वाचे आव्हान उभे राहिले आहे. पोलीस असल्याचे भासवून व्यापाऱ्याला अडवणारे हे तिघे नेमके कोण होते? त्यांनी दाखवलेले कार्ड खरे होते की बनावट? त्यांचा उद्देश केवळ लुटमारीचा होता की यामागे आणखी काही कारण आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

व्यापाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

बोदवड शहर व परिसरात व्यापारी वर्गाची वर्दळ असलेल्या रस्त्यांवर अशा प्रकारची घटना घडल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संबंधित संशयितांची ओळख पटवून त्यांचा शोध घेणे, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणे आणि व्यापाऱ्यांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे आवश्यक आहे.बोदवड पोलिसांकडून या घटनेची किती गांभीर्याने दखल घेतली जाते आणि संशयितांना शोधून काढण्यात यश मिळते का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या