Saturday, November 21, 2026
Homeगुन्हायावलमध्ये अंत्ययात्रा अडविल्याप्रकरणी अखेर गुन्हा दाखल.

यावलमध्ये अंत्ययात्रा अडविल्याप्रकरणी अखेर गुन्हा दाखल.

यावलमध्ये अंत्ययात्रा अडविल्याप्रकरणी अखेर गुन्हा दाखल.

घटनेनंतर २४ तासांहून अधिक कालावधीनंतर पोलिसांची कारवाई; आरोपी अद्याप अटकेबाहेर

यावल,    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी     दि. २१
यावल शहरात अंत्ययात्रा सुरू असताना कथितरीत्या अडथळा निर्माण करून जातिवाचक व अपमानास्पद शब्दांचा वापर केल्याच्या प्रकरणाला अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल करून कायदेशीर स्वरूप दिले आहे.या घटनेप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला गु.र.क्र.४०६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा दाखल होऊनही संबंधित आरोपींना अद्याप अटक झालेली नसल्याची माहिती समोर येत आहे.

नेमकी घटना काय ?
पोलिसांकडे दाखल फिर्यादीनुसार,दि.१८ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी सुमारे १०.४५ वाजेच्या दरम्यान यावल शहरातील बुरुज चौक ते एच. एस.खान चौक रोडवरील नगिना मशीदजवळून फिर्यादी शितलकुमार युवराज घारु हे अंत्ययात्रा घेऊन जात असताना हा प्रकार घडल्याचे नमूद करण्यात आले आहे.

यावेळी आरोपींनी अंत्ययात्रेतील वाद्ये बंद करण्यास सांगून जातिवाचक व अपमानास्पद भाषा वापरली,तसेच दमदाटी केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.दुसऱ्या आरोपीनेही अंत्ययात्रेची वाद्ये बंद करण्यास सांगून या प्रकाराला प्रोत्साहन दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी शाहबुद्दीन ऊर्फ शाबीर इसाबुद्दीन शेख आणि शेख हबीब शेख निसार ऊर्फ हबीब मंजर दोन्ही रा.यावल, यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनेक गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल —
यावल पोलीस स्टेशनला दाखल गु.र.क्र. ४०६/२०२६ मध्ये भारतीय न्याय संहिता कलम ३०१, ४९, ३५२, ३५१(२) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३(१)( आर ), ३( १ )( एस) व ३ ( २ ) ( व्हीए ) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दि. १८ नोव्हेंबर रोजी घडलेल्या कथित घटनेनंतर दि. २० नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १.५५ वाजता गुन्हा दाखल झाल्याची नोंद एफआयआरमध्ये आहे.त्यामुळे घटनेपासून गुन्हा नोंदविण्यापर्यंत २४ तासांपेक्षा अधिक कालावधी गेल्याचे स्पष्ट होते. या विलंबाबाबत नेमकी कारणे काय,याबाबत पोलिसांकडून अधिकृत स्पष्टीकरण अपेक्षित आहे.
तपास फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे
या गुन्ह्याचा पुढील तपास फैजपूर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्याकडे असल्याचे पोलिसांच्या कागदपत्रात नमूद आहे.
गुन्हा दाखल झाला असला तरी आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याने पुढील पोलीस कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
पोलीस प्रेस नोट नसल्याने प्रसिद्धी माध्यमांत नाराजी.
पोलीस काही गुन्ह्यांमध्ये मात्र स्वतःहून प्रेस नोट देतात तर काही गुन्ह्यांमध्ये प्रेस नोट देत नाही यामुळे पोलिसांच्या कामकाजाबाबत आणि दाखल गुन्ह्यातील आरोपीं बाबत अनेक प्रश्न उपस्थित होतात.

दरम्यान,यावल शहरातील या संवेदनशील घटनेबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतरही पोलिसांकडून प्रसिद्धी माध्यमांना अधिकृत प्रेस नोट किंवा घटनेची सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात आली नसल्याने पत्रकार व प्रसिद्धी माध्यमांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
शहरातील कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित संवेदनशील घटना असताना पोलिसांनी अधिकृत माहिती वेळेत उपलब्ध करून दिल्यास वस्तुस्थिती जनतेसमोर येण्यास मदत होते.तसेच अपूर्ण माहिती, अफवा अथवा गैरसमजांना आळा बसू शकतो.त्यामुळे अशा घटनांमध्ये पोलिसांच्या अधिकृत माहिती व्यवस्थेने अधिक पारदर्शक आणि तत्पर असणे गरजेचे आहे.
यावल शहरात एवढी गंभीर घटना घडल्यानंतर यावल पोलिसांनी शांतता समितीची बैठक घेतली किंवा नाही.? याबाबत सुद्धा चर्चा आहे.

आता पुढील कारवाईकडे यावलकरांचे लक्ष!
अंत्ययात्रेसारख्या दुःखद प्रसंगी अंत्ययात्रा आडवीण्याची घटना घडल्याचा आरोप असलेला हा प्रकार सामाजिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.त्यामुळे दाखल गुन्ह्याचा निष्पक्ष तपास होऊन वस्तुस्थिती समोर यावी,दोषीं विरुद्ध कायद्यानुसार कारवाई व्हावी आणि कोणत्याही समाजघटकाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
आता या प्रकरणात पोलिसांकडून पुढे काय कारवाई होते.? आरोपींना कधी अटक होते.? आणि तपासातून नेमकी कोणती वस्तुस्थिती समोर येते, याकडे यावल शहरासह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या