रोटरी क्लब भुसावळ येथे प्रांतपालांची अधिकृत भेट उत्साहात संपन्न

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ भुसावळ येथे गुरुवार, दिनांक १९ नोव्हेंबर २०२६ रोजी रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे प्रांतपाल रोटेरियन राजेश पाटील यांची अधिकृत क्लब भेट उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. यावेळी असिस्टंट गव्हर्नर रोटे. हरविंदरसिंग थेठी हेही उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सायंकाळी ५ ते ५.३० या वेळेत प्रांतपाल, असिस्टंट गव्हर्नर, क्लब अध्यक्ष, अध्यक्ष निर्वाचित व सचिव यांची बंदिस्त बैठक झाली. त्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता क्लबच्या संचालक मंडळाच्या सदस्यांसोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत क्लबच्या वर्षभरातील कार्याचा आढावा, विविध सेवाप्रकल्प, सामाजिक उपक्रम आणि आगामी योजनांवर चर्चा करण्यात आली.
त्यानंतर मुख्य कार्यक्रमाची सुरुवात डॉ. पूर्वा ठाकूर यांनी सादर केलेल्या सुरेल गणेश वंदनाने झाली. प्रांतपाल रोटे. राजेश पाटील, असिस्टंट गव्हर्नर रोटे. हरविंदरसिंग थेठी, क्लब अध्यक्ष रोटे. मदन बोरकर, सचिव रोटे. जी. आर. अय्यर आणि इनक्लेव्ह चेअर श्री. अनंत पाटील यांच्या शुभहस्ते शारदामातेच्या प्रतिमेचे पूजन, माल्यार्पण व दीपप्रज्वलन करण्यात आले.
यानंतर प्रांतपाल रोटे. राजेश पाटील यांचे क्लब अध्यक्ष श्री. मदन बोरकर यांनी पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन स्वागत व सत्कार केला. तसेच असिस्टंट गव्हर्नर रोटे. हरविंदरसिंग थेठी यांचे स्वागत व सत्कार क्लबचे सचिव श्री. जी. आर. अय्यर यांनी पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन केला.
यावेळी क्लब अध्यक्ष मदन बोरकर यांनी आपल्या मनोगतात रोटरी क्लब ऑफ भुसावळच्या आजपर्यंतच्या कार्याचा सविस्तर आढावा सादर केला. क्लबच्या माध्यमातून राबविण्यात येणारे विविध समाजोपयोगी उपक्रम, क्लबचे कार्य चालविण्याची पद्धत तसेच आगामी काळात नियोजित असलेल्या सामाजिक व सेवाभावी प्रकल्पांची माहिती त्यांनी दिली.
यानंतर प्रांतपाल रोटे. राजेश पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात रोटरीचे महत्त्व, रोटरीची सेवाभावी परंपरा आणि समाजोपयोगी प्रकल्पांची आवश्यकता याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. प्रत्येक रोटेरियनने केवळ सभासद म्हणून न राहता समाजातील गरजू घटकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्यासाठी उपयुक्त असे सेवाकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक विकास अशा विविध क्षेत्रांत परिणामकारक प्रकल्प राबवून समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. तसेच समाजहितासाठी निधी उभारणी करून त्याचा योग्य प्रकारे समाजोपयोगी कामांसाठी विनियोग करण्याचे आवाहनही त्यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थित रोटेरियन्सना नव्या सेवाकार्यासाठी प्रेरणा मिळाली.
या प्रसंगी डी जी डॉ राजेश पाटील यांनी त्यांचे हस्ते विशेष लक्षणीय कार्यासाठी जी आर ठाकूर यांना त्यांच्या कार्याबद्दल पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी रोटे. जी. आर. ठाकूर, श्री. अनंत पाटील, महेश भराडे, डॉ. युवराज बढे, डॉ. माया आर्विकर, डॉ. आर्विकर, रत्नाकर क्षीरसागर, संजय चापोरकर, गोपाल तिवारी, मंगला पाटील, अशोक निकम, रेल सिटी चे अध्यक्ष सुयश न्याती ,मंगेश यावलकर, डॉ. नितीन दावलभक्त, डॉ. राहुल पांडे, डॉ. समीर चौधरी तसेच श्री अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा अलकाताई ढाके यांच्यासह अनेक मान्यवर व रोटरी सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ नारायण आर्विकर यांनी केले.
या कार्यक्रमास जी आर ठाकूर यांचे मार्गदर्शन आणि उपस्थित सर्व रोटरीयन यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ. मंगला पाटील यांनी केले. त्यांनी प्रांतपाल, असिस्टंट गव्हर्नर, सर्व मान्यवर, रोटेरियन सदस्य व कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. त्यानंतर सर्व उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रांतपालांच्या या अधिकृत भेटीमुळे क्लबच्या कार्याचा आढावा घेण्याबरोबरच भविष्यातील सेवाप्रकल्पांना नवी दिशा व प्रेरणा मिळाली.

