वंदे भारतसह तीन रेल्वे गाड्यांना विलंब! २७ नोव्हेंबरला NI ब्लॉक; वंदे भारत १ तास ५५ मिनिटे उशिराने सुटणार

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी : रेल्वे वाहतूक अधिक सुरक्षित आणि गतिमान करण्यासाठी भुसावळ विभागातील भुसावळ–बडनेरा रेल्वे मार्गावर माना–मूर्तिजापूर दरम्यान स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग यंत्रणा कार्यान्वित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी शुक्रवार, २७ नोव्हेंबर रोजी अप आणि डाउन मार्गावर नॉन-इंटरलॉकिंग (NI) ब्लॉक घेण्यात येणार असून, यामुळे तीन रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक २०६२५ चेन्नई–भगत की कोठी एक्स्प्रेस कुरुम स्थानकावर एक तास नियंत्रित करण्यात येणार आहे. गाडी क्रमांक २६१०२ अजनी–पुणे वंदे भारत एक्स्प्रेस अजनी स्थानकावरून नियोजित वेळेपेक्षा तब्बल १ तास ५५ मिनिटे उशिराने सुटणार आहे. तर गाडी क्रमांक ६११०२ बडनेरा–भुसावळ मेमू एक तास विलंबाने रवाना होणार आहे.
स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग प्रणालीमुळे रेल्वे गाड्यांच्या संचालनावर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवता येणार असून, रेल्वे वाहतुकीची सुरक्षितता आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे. भविष्यात गाड्यांची वाहतूक अधिक सुरळीत आणि गतिमान करण्याच्या दृष्टीने हे काम महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
दरम्यान, २७ नोव्हेंबर रोजी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी गाड्यांच्या सुधारित वेळापत्रकाची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पायाभूत सुविधा आणि सुरक्षिततेच्या कामामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल प्रशासनाने प्रवाशांची दिलगिरी व्यक्त केली आहे.

