Tuesday, November 24, 2026
Homeजळगावभुसावळ तालुक्यातील २८ अंगणवाड्यांचा होणार कायापालट !

भुसावळ तालुक्यातील २८ अंगणवाड्यांचा होणार कायापालट !

भुसावळ तालुक्यातील २८ अंगणवाड्यांचा होणार कायापालट !

मंत्री संजय सावकारे यांच्या पाठपुराव्याला यश; स्मार्ट अंगणवाड्यांसाठी ४६.०७ लाखांचा निधी मंजूर, २२ गावांतील बालकांना मिळणार आधुनिक सुविधांचा लाभ

भुसावळ    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
ग्रामीण भागातील चिमुकल्यांच्या शिक्षणाला आधुनिकतेची जोड देण्यासाठी भुसावळ तालुक्यात महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय वामन सावकारे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तालुक्यातील तब्बल २८ अंगणवाडी केंद्रांचे स्मार्ट अंगणवाड्यांमध्ये रूपांतर होणार आहे. यासाठी शासनाकडून ४६ लाख ७ हजार ६८० रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अंगणवाड्यांचे स्वरूप बदलण्यासह बालकांना आधुनिक शिक्षणाच्या सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महिला व बालविकास विभागाने एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी केंद्रांचे आदर्श अंगणवाडी केंद्रांमध्ये रूपांतर करण्यासाठी स्मार्ट अंगणवाडी किट खरेदीला २ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता दिली आहे. या निर्णयात भुसावळ तालुक्यातील २८ अंगणवाडी केंद्रांचा समावेश करण्यात आला आहे. मंत्री संजय सावकारे यांच्या पाठपुराव्यामुळे तालुक्याला हा महत्त्वपूर्ण लाभ मिळाला आहे

एका अंगणवाडीसाठी १.६४ लाखांचे स्मार्ट किट –
योजनेअंतर्गत प्रत्येक स्मार्ट अंगणवाडी किटसाठी जीएसटीसह १ लाख ६४ हजार ५६० रुपये खर्च निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार २८ अंगणवाडी केंद्रांसाठी ४६ लाख ७ हजार ६८० रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या माध्यमातून अंगणवाड्यांना आधुनिक शैक्षणिक साहित्य आणि आवश्यक सुविधांनी सुसज्ज करण्याचा उद्देश आहे.

या २२ गावांतील अंगणवाड्यांचा समावेश –
कंडारी, खडके, जाडगाव, निंभोरा बु., सावतर, सुसरी, कन्हाळे बु., किन्ही, साकरी, भिलमळी, चोरवड, गोजोरे, कुऱ्हे पानाचे, खेडी, महादेव माळ, दर्यापूर, काहुरखेडा, मानपूर, तळवेल, गोंभी, वराडसिम आणि फुलगाव या गावांमधील अंगणवाडी केंद्रांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

अंगणवाड्यांमध्ये डिजिटल शिक्षणाची नवी पहाट !

स्मार्ट अंगणवाडी किटच्या माध्यमातून बालकांना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित पूर्वप्राथमिक शिक्षण, शैक्षणिक साहित्य, आरोग्यविषयक सुविधा आणि पोषणविषयक सेवा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. बालकांसाठी स्वच्छ, सुरक्षित आणि आनंददायी शैक्षणिक वातावरण निर्माण होण्यास या उपक्रमाची मदत होणार आहे

अंगणवाडी ही बालकांच्या शैक्षणिक जीवनाची पहिली पायरी मानली जाते. वयाच्या शून्य ते सहा वर्षांपर्यंतच्या बालकांच्या बौद्धिक, शारीरिक आणि सामाजिक विकासाचा पाया याच केंद्रांमध्ये घातला जातो. त्यामुळे अंगणवाड्यांचे आधुनिकीकरण म्हणजे ग्रामीण भागातील बालकांच्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे.
मंत्री संजय सावकारे यांच्या पाठपुराव्यामुळे भुसावळ तालुक्यातील २२ गावांना मिळालेला हा लाभ ग्रामीण भागातील बालशिक्षणाला नवी दिशा देणारा ठरणार आहे. आता या मंजूर योजनेची प्रभावी अंमलबजावणी होऊन संबंधित अंगणवाड्यांमध्ये स्मार्ट सुविधांचा प्रत्यक्ष लाभ बालकांना कधीपासून मिळतो, याकडे ग्रामस्थ आणि पालकांचे लक्ष लागले आहे

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या