भुसावळच्या राधाकृष्ण हॉटेलच्या पार्किंगमध्ये मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ!
हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरील गॅलरीतून पडल्याचा प्राथमिक अंदाज; अपघात की घातपात, पोलिसांकडून तपास सुरू

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
भुसावळ येथील राधाकृष्ण हॉटेलच्या पार्किंग परिसरात मुंबई येथील ४६ वर्षीय शिवानंद माळी यांचा मृतदेह आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

हॉटेलच्या ३२३ क्रमांकाच्या खोलीत मित्रासोबत मुक्कामाला असलेले शिवानंद माळी हे मध्यरात्रीच्या सुमारास खोलीबाहेर पडले होते. त्यानंतर काही वेळातच ते हॉटेलच्या गॅलरीतून खाली पडून पार्किंग परिसरात गंभीर अवस्थेत आढळून आले.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे दोन वाजेच्या सुमारास शिवानंद माळी हे खोलीतून बाहेर गेले होते. मात्र, २० ते २५ मिनिटांनंतर ते हॉटेलच्या पार्किंग परिसरात पडलेल्या अवस्थेत आढळले. घटनेची माहिती मिळताच त्यांना तातडीने ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे .
सीसी टिव्ही तपासणी नंतर याबाबत कारण स्पष्ट होणार आहे .

