थोरगव्हाण येथे डी. एस. देशमुख विद्यालयात संविधान दिन व २६/११ च्या शहीद वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण

संविधान प्रास्ताविकेचे पूजन, पोस्टर प्रदर्शनाचे अवलोकन आणि संविधान प्रश्नमंजुषा परीक्षेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग सावदा खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी थोरगव्हाण
येथील डी. एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात २६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिन तसेच मुंबई येथे झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर अधिकारी व जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मुंबई दहशतवादी हल्ल्यात देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीर अधिकारी व जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. भारतीय संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी विद्यालयाला भेट दिलेल्या संविधानविषयक पोस्टर प्रदर्शन संचाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचे अवलोकन करून भारतीय संविधानाची निर्मिती, त्यातील मूलभूत तत्त्वे, नागरिकांचे अधिकार व कर्तव्ये यांची माहिती जाणून घेतली.
भारतीय संविधान दिनानिमित्त संविधानाच्या प्रास्ताविकेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी टी. आर. चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या शुभहस्ते संविधान प्रास्ताविकेचे पूजन संपन्न झाले. प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन के. एम. पाटील यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक डी. के. पाटील, ज्येष्ठ शिक्षक व्ही. वाय. कुरकुरे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
दुपारच्या सत्रात इयत्ता ५ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी संविधानावर आधारित प्रश्नावली परीक्षा आयोजित करण्यात आली. या परीक्षेत २७ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना टी. आर. चौधरी यांच्या हस्ते रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे :
* प्रथम क्रमांक : कु. एकता योगेश कुंभार, वर्ग ९ वा — २०१ रुपये.
* द्वितीय क्रमांक : कु. मानसी संदीप काळे, वर्ग १० वा — १५१ रुपये.
* तृतीय क्रमांक : कु. जागृती धनराज पाटील, वर्ग १० वा (ब) — १०१ रुपये.
यावेळी मुख्याध्यापक डी. के. पाटील यांनी विजयी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून संविधानाचे महत्त्व, लोकशाही मूल्ये आणि प्रत्येक नागरिकाने आपल्या अधिकारांसोबत कर्तव्यांचीही जाणीव ठेवण्याचे आवाहन केले.
प्रश्नावली परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे परीक्षण मुख्याध्यापक डी. के. पाटील, व्ही. वाय. कुरकुरे, पी. सी. कचरे, सौ. जयश्री चौधरी व एन. बी. चौधरी यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम. के. पाटील यांनी केले. याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतीय संविधानाप्रती आदरभाव, लोकशाही मूल्यांची जपणूक आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर जवानांच्या त्यागाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणारा हा उपक्रम विद्यालयात प्रेरणादायी ठरला.

