शेळगाव बॅरेजच्या नदीपात्रात ४५ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या; दोन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर मृतदेह आढळला!

जळगाव एमआयडीसी येथे वास्तव्यास; नामांकित कृषी कंपनीत मार्केटिंग मॅनेजर म्हणून होते कार्यरत
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शेळगाव बॅरेज परिसरातील नदीपात्रात उडी घेऊन ४५ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. राजू शहाजी नेरकर (वय ४५, मूळ रा. जिल्हा भंडारा, सध्या रा. जळगाव एमआयडीसी) असे मृत व्यक्तीचे नाव असून, ते एका नामांकित कृषी कंपनीत मार्केटिंग मॅनेजर म्हणून कार्यरत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी राजू नेरकर यांनी शेळगाव बॅरेज पुलावरून नातेवाईकांशी मोबाईलद्वारे संपर्क साधल्यानंतर नदीपात्रात उडी घेतल्याची माहिती ग्रामस्थांकडून मिळाली. घटनेची माहिती समजल्यानंतर नातेवाईकांच्या विनंतीवरून जिल्हा प्रशासनाच्या वतीने शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. दोन दिवसांच्या शोधकार्यानंतर आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळून आला.
दरम्यान, भुसावळ नगरपरिषद अग्निशमन दलाला दुपारी २ वाजता घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर शोध व बचाव कार्यासाठी पथकाने घटनास्थळी धाव घेतली. नगरपरिषद प्रशासनाचे जिल्हा सहआयुक्त तथा मुख्याधिकारी जनार्दन पवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख नरवीरसिंग रावल आणि यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.

या शोधमोहिमेत भुसावळ अग्निशमन दलाचे कर्मचारी गजेंद्र जावळे, हितेश रायपुरकर, गौरव सपकाळे, गजू सावकारे, समाधान पाटील, यावल पोलीस स्टेशनचे उमेश महाजन व त्यांचे सहकारी तसेच स्थानिक ग्रामस्थांनी सहभाग घेत सहकार्य केले.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांकडून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

