धुळे महापौर राजीनामा व गोरक्षक संजय शर्मा हल्ल्याच्या निषेधार्थ यावलमध्ये निवेदन ;

३० नोव्हेंबरला धुळे एसपी कार्यालयावर धरणे आंदोलनाचा इशारा.
यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.२७ धुळे शहरातील गोरक्षक संजय शर्मा यांच्या घरावर झालेला हल्ला,श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धुळे जिल्हा कार्यालयाची तोडफोड आणि या संपूर्ण प्रकरणातील कथित अन्यायाविरोधात यावळ तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाद्वारे धुळ्याच्या महापौरांचा तत्काळ राजीनामा घेण्याची आणि संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावल तहसीलदारांकडे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की
धुळे शहरातील गोरक्षक संजय शर्मा यांच्या निवासस्थानी धुळ्यातील महापौरांच्या गुंडांमार्फत हल्ला करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धुळे जिल्हा कार्यालयाची तोडफोड करून मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याचे म्हटले आहे.
या प्रकरणात एफआयआर दाखल असूनही हल्लेखोर आरोपींना अद्याप अटक झालेली नाही,तर दुसरीकडे गोरक्षक संजय शर्मा यांच्यावर खोटे आरोप लावून त्यांना अटक केल्याने तपासाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
या घटनेत धुळे शहराचे महापौर व आमदार यांच्याशी संबंधित व्यक्तींच्या भूमिकेबाबत गंभीर आरोप व संशय व्यक्त करून राजकीय दबावापासून मुक्त, पारदर्शक आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत चौकशीची मागणी केली आहे.
संघटनेच्या प्रमुख मागण्या
महापौरांचे चिरंजीव व त्यांच्या गुंडांमार्फत झालेल्या हल्ल्याची जबाबदारी निश्चित करून धुळ्याच्या महापौरांचा राजीनामा घ्यावा.
गोरक्षक संजय शर्मा यांच्यावरील दाखल प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून त्यांच्यावरील खोट्या आरोपांची तात्काळ कायदेशीर सुटका करावी.
संजय शर्मा यांच्या घरावर हल्ला व जिल्हा कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या सर्व आरोपींची तात्काळ ओळख पटवून त्यांना अटक करावी.
हल्ल्यामागील सूत्रधार, कटकारस्थान करणारे, आर्थिक मदत करणारे आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी असलेल्या सर्वांची सखोल चौकशी करावी.
संबंधित हल्ल्यातील आरोपी, धुळे शहराचे महापौर, संबंधित आमदार व इतर संशयित व्यक्तींचे कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) तसेच आवश्यकतेनुसार इतर डिजिटल पुराव्यांची कायदेशीर प्रक्रियेनुसार तपासणी करावी.
संपूर्ण प्रकरणाचा तपास स्थानिक राजकीय दबावापासून मुक्त ठेवण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या विशेष तपास पथकामार्फत (SIT) किंवा स्वतंत्र यंत्रणेमार्फत करावा.
धुळे शहरातील अनधिकृत कत्तलखाने, बेकायदेशीर पशुवध केंद्रे व गोहत्या होत असल्याच्या तक्रारी असलेल्या ठिकाणांची तातडीने तपासणी करून बेकायदेशीर कत्तलखान्यांवर कठोर कारवाई करून ते बंद करावेत.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धुळे जिल्हा कार्यालयाचे झालेले नुकसान पंचनाम्याद्वारे निश्चित करून संबंधितांकडून नुकसानभरपाई मिळवून द्यावी.
या प्रकरणातील तपासाची सद्यस्थिती व केलेल्या कारवाईचा लेखी अहवाल निवेदनकर्त्या संघटनांना द्यावा.
आंदोलनाचा इशारा
निवेदनातील मागण्यांची पूर्तता न झाल्यास, सोमवार, दिनांक ३०/११/२६ रोजी थेट धुळे एसपी कार्यालयासमोर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे महाराष्ट्रभरातील धारकरी धरणे आंदोलन करतील, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सागर कृष्णा लोहार यांची स्वाक्षरी आहे.
यावल तहसीलदार यांच्याकडे दिलेल्या निवेदनावर सागर लोहार यांच्यासह कमलेश शिर्के, चंदन फेगडे,सुरज धंजे, लोकेश चौधरी,धीरज भोळे,हेमंत कोळी,प्रणव पाटील,सागर कोळी, योगेश कोळी, सौरभ पाटील,पृथ्वीराज भोई,अक्षय पाटील,हेमंत कोळी,विवेक पाटील,मनीष चौधरी,लोकेश किरंगे, टेकचंद किरंगे, सोहम पाटील,श्रीराम बोरसे, वासुदेव भोळे,यांची स्वाक्षरी आहे.

