Saturday, May 2, 2026
Homeजळगावआमोदा-पिंपरुड रस्त्यावर भीषण अपघात – पुलाचा कठडा तोडून खाजगी बस कोसळली नदीत...

आमोदा-पिंपरुड रस्त्यावर भीषण अपघात – पुलाचा कठडा तोडून खाजगी बस कोसळली नदीत ; एक महिला जागीच ठार तर इतर गंभीर जखमी

आमोदा-पिंपरुड रस्त्यावर भीषण अपघात – पुलाचा कठडा तोडून खाजगी बस कोसळली नदीत ; एक महिला जागीच ठार तर इतर गंभीर जखमी
. लक्झरी चालक फरार
आमदार अमोल भाऊ जावळे यांनी केली अपघात स्थळाची पाहणी जखमींना तात्काळ उपचारासाठी दिले निर्देश

फैजपूर : खान्देश लाईव्ह प्रतिनिधी

आज सकाळी आमोदा-पिंपरुड रस्त्यावर भीषण अपघाताची घटना घडली. इंदोरहून जळगावकडे येणारी श्री गणेश लक्झरी खासगी प्रवासी बस एम पी ०९ -९००९ ही आमोद्याजवळील मोर नदीच्या पुलाचा कठडा तोडून थेट पुलाच्या खाली कोसळली. या अपघातात एका वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. यात फरीदा शब्बीर हुसैन (वय – ६४) राहणार भवानी पेठ जळगांव यांचा मृत्यू झाला तर गाडीतील २० ते २५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. बस पुलावरून सुमारे २० फूट खोल खाली उलटलेली असून, अपघातानंतर बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. यावेळी शेतात आलेले आमोदे येथील धनराज शेठ चौधरी यांनी गावातील पोलीस पाटील तुषार पाटील यांना फोन करून नागरिकांसह बोलविले. तात्काळ घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने फैजपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने नदीमध्ये पाण्याचा प्रवाह नव्हता. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
घटनास्थळी पोलीस, आपत्कालीन सेवा आणि क्रेनच्या सहाय्याने बस हटवण्याचे काम सुरू होते. विशेष म्हणजे, आमोदा परिसरात हा या दोन महिन्यातील ३५ वा अपघात असून, या मार्गावरील वाहतूक सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.

 


स्थानिक आमदार अमोल जावळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे (PWD) अभियंता श्री. विश्वानंद तायडे यांना घटनास्थळी बोलावले आणि अपघाताच्या कारणांचा सविस्तर आढावा घेतला. रस्त्यावरील तांत्रिक दोष, चुकीचे वळण, साईन बोर्ड व रिफ्लेक्टरची कमतरता, तसेच सुरक्षा कठड्यांची आवश्यकता यावर सखोल चर्चा झाली. यावेळी आमदार जावळे यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, “ज्या तांत्रिक त्रुटींमुळे अपघात होत आहेत, त्या दूर करण्यासाठी पुढील आठ दिवसांत ठोस उपाययोजना करा. अन्यथा याप्रकरणी गाठ माझ्याशी आहे. दररोज या मार्गावर शेकडो प्रवासी प्रवास करत असतात. त्यामुळे भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी रस्त्यावरील सुरक्षाव्यवस्था तातडीने सुधारण्याचे आवाहन त्यांनी संबंधित यंत्रणेला केले. या अपघाताप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अली असगर नादर वय (३७) राहणार, मुंबई यांनी फिर्याद दाखल केली आहे. लक्झरी चालक हा फरार असून फैजपूर पोलीस स्टेशनला गु.रजि. नं. २१७/२०२५ BNS. कलम १०६, २८१, १२५, (a) १२५(b)३२४, (४), मोटार वाहन कायदा कलम, १८४, १३४(b) प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्यासह पोलीस कर्मचारी करीत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या