बस स्थानक परिसरातील हॉटेलात चोरट्यांचा धुमाकूळ : चिल्लर घेवून फरार !
धरणगाव खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – तालुक्यातील पाळधी येथील बस स्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये चोरट्यांनी येवून तेथे ताव मारला, अन् त्यानंतर चिल्लर घेऊन या चोरट्यांनी पोबारा केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे कि, येथील बस स्थानक परिसरातील हॉटेलवरच हॉटेल चालकाची गुजरान होते. गुरुवारी रात्री हॉटेल बंद करून ते घरी गेले. तर आज सकाळी दुकान उघडल्यावर तेथे त्यांना हॉटेलमधील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. या वेळी त्यांना हॉटेलच्या वरचा पत्रा उचकलेला दिसला. तर हॉटेलमध्ये पाण्याचे ग्लास तसेच प्लेटा पडलेल्या होत्या. चोरट्यांनी हॉटेलमध्ये पोहे तयार करून ते खाल्ले अन् तेथेच दारुही रिचवल्याचे आढळून आले. याच वेळी चोरट्यांनी छोट्याशा पेटीत ठेवलेली चिल्लर लंपास करून पोबारा केला होता. तर याच परिसरात आणखी एक दुकान फोडण्याचा चोट्यांनी प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही, अशी चर्चा परिसरात सुरू होती. दरम्यान, किरकोळ नुकसान झाल्याने हॉटेल मालकांनी पोलिसांत तक्रार केली नाही.
मात्र, या घटनेने परिसरात भीती पसरली असून दुकानदार अस्वस्थ झाल्याचे चित्र दिसत होते. दरम्यान, याच परिसरात गत आठवड्यात दुकानाबाहेर लावलेले विजेचे दिवे (बल्ब) चोरट्यांनी लंपास केले होते. एकाच ठिकाणी चोरट्यांनी हीच चोरी दोन वेळा केल्याने आता दुकानदार रात्री आपले दुकान बंद करताना ते बल्ब काढून घेत आहेत.