पूर्ववैमनस्यातून चाकूहल्ला; तब्बल १९ जणांवर गुन्हा दाखल!
अमळनेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – पूर्ववैमनस्यातून वाद निर्माण होऊन हाणामारी झाली. यात चाकू हल्ल्यासह लाठीकाठ्यांचा वापर करून तिघेजण जखमी झाले. ही घटना ९ ऑगस्ट रोजी रात्री घडली. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणत १९ जणांवर गुन्हा दाखल केला.
काही व्यक्तींनी शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. सनी राजू जाधव, विनोद टिल्लू जाधव व छोटू विनोद जाधव यांनी लाठीकाठ्यांनी हल्ला केला. नितेश विकास जाधव याने हातातील सुऱ्याने भगत सुनील चिरावंडे याच्या पोटात वार केला तर विकास उर्फ बुद्धा टिल्लू जाधव याने राकेश कल्याणे याच्या हातावर हल्ला केला. पल्लू घारु, करण विनोद जाधव, आकाश जगन जेधे, राजा सुनील खरारे यांनी नरेश कालू कल्याणे यांच्या डोक्यावर काठीने मारून जखमी केले. राजेश पापाराम दाभोळे व शक्ती दाभोळे यांनी इतरांवर हल्ला करून दुखापत केली. एकूण १९ जणांनी शिवीगाळ व मारहाण केल्याचा गुन्हा नोंदवला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वाखाली सपोनि रवींद्र पिंगळे, पोउनि भगवान शिरसाठ, नामदेव बोरकर, युवराज बागुल, शरद काकळीज, तसेच पोलिस पथक घटनास्थळी दाखल होऊन जमाव पांगवला. पोलिसांच्या वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला. जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना धुळे येथे हलवण्यात आले असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे. घटनास्थळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.