तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या युवकाला ठोकल्या बेड्या !
पाचोरा खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – शहरातील जारगाव चौफुली येथे एक तरुण व्यक्ती लोखंडी तलवार घेऊन दहशत माजवत होता. या दहशत माजवणाऱ्या तरुणास पाचोरा पोलिसांनी अटक केली आहे.
पो.नि. राहुलकुमार पवार यांना एक तरुण तलवार घेवून दहशत माजवत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर पो.नि. राहूल पवार यांनी पथक तयार करून तत्काळ कारवाईचे आदेश दिले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन संशयित सोमनाथ वना पाटील (वय १९, रा. हनुमाननगर, पाचोरा) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक लोखंडी तलवार जप्त करण्यात आली. या प्रकरणी पो.कॉ. योगेश पाटील यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शस्त्र अधिनियमांतर्गत आठवड्यातील सलग दुसरी कारवाई पाचोरा पोलिसांनी केली आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनात पो.नि. राहुलकुमार पवार, पो.उ.नि. कृष्णा घायाळ तसेच पोलीस कर्मचारी संदीप राजपूत, जितेश पाटील, योगेश पाटील व हरीश परदेशी यांनी केली.