जनावरे चोरीच्या घटनांत वाढ : गोठ्यातून ५ म्हशी, १ बैल यांची चोरी; गुन्हा दाखल!
अमळनेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यात जनावरे चोरीच्या घटना पुन्हा वाढू लागल्या असून, लोणे शिवारातील गट नंबर २९ मधील अनिल राजाराम पाटील या शेतकऱ्याचे सुमारे ७२ हजार रुपये किमतीचे शेतीउपयोगी पशुधन चोरीला गेले आहे. ५ म्हशी आणि १ बैल अशा सहा जनावरांची चोरी झाल्याची घटना शनिवारी ४ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री २.३० वाजता घडली आहे. याबाबत अमळनेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, अमळनेर तालुक्यातील लोणे येथील रहिवासी असलेले शेतकरी अनिल पाटील यांच्या लोणे शिवारातील गोठ्यातून ही जनावरे चोरी झाली. या चोरीमुळे अनिल पाटील यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सकाळी त्यांना हा प्रकार कळताच त्यांनी सर्वत्र शोधमोहीम राबवली. नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांच्या मदतीने जनावरे शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु काहीही हाती लागले नाही. त्यानंतर हताश होऊन त्यांनी दुपारी १ वाजता अमळनेर पोलीस ठाणे गाठले आणि फिर्याद दाखल केली. चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला आहे. पोलीस हवालदार सुनील जाधव हे प्रकरणाचा तपास करत आहेत. अमळनेर ग्रामीण भागात शेती उपयोगी जनावरांच्या चोऱ्या वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी या चोरट्यांना लवकरात लवकर पकडावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.