दिशा महाराष्ट्राच्या यूट्यूब चॅनेलतर्फे प्रदीर्घ साहित्यसेवेबद्दल सन्मान
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – जळगाव येथे वास्तव्यास असलेल्या सुप्रसिद्ध लेखिका व कवयित्री शैलजा करोडे यांना त्यांच्या प्रदीर्घ व भरीव साहित्यसेवेबद्दल ‘साहित्य भूषण २०२६’ या प्रतिष्ठित पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कारनेरूळ, नवी मुंबई येथील ‘दिशा महाराष्ट्राची’ या लोकप्रिय यूट्यूब चॅनेलच्या वतीने प्रदान करण्यात आला असून, महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रासाठी दिला जाणारा हा मानाचा सन्मान मानला जातो.
शैलजा करोडे यांनी आपल्या लेखनातून समाजातील विविध प्रश्न, मानवी संवेदना, नातेसंबंध, स्त्रीजीवन, सामाजिक वास्तव तसेच माणुसकीच्या मूल्यांचा सखोल वेध घेतला आहे. त्यांच्या लेखनात संवेदनशीलता, प्रांजळपणा आणि प्रभावी शब्दसौंदर्य यांचा सुंदर मिलाफ आढळतो. त्यामुळेच वाचकवर्गात त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.नुकतेच त्यांची तीन नवी पुस्तके प्रकाशित झाली असून, त्यामध्ये ‘माणुसकी’ (कथासंग्रह), ‘हुंकार काळजाचा’ (कवितासंग्रह) आणि ‘निशिगंध’ (ललित लेख संग्रह) यांचा समावेश आहे. या तिन्ही पुस्तकांना वाचकांकडून तसेच साहित्यवर्तुळातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आजपर्यंत शैलजा करोडे यांची एकूण २६ पुस्तके प्रकाशित झाली असून, विविध साहित्यप्रकारांमध्ये त्यांनी यशस्वी मुशाफिरी केली आहे.पुरस्कार स्वीकारताना शैलजा करोडे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, साहित्य हे समाजाशी संवाद साधण्याचे प्रभावी माध्यम असून, आपल्या लेखनातून माणसातील माणुसकी जागवण्याचा प्रयत्न आपण नेहमी केला आहे. हा पुरस्कार आपल्याला अधिक जबाबदारीने लिहिण्यास प्रेरणा देणारा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
या पुरस्कारामुळे जळगाव, नवी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील साहित्यप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण असून, साहित्यिक, वाचक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून शैलजा करोडे यांचे अभिनंदन केले जात आहे. त्यांच्या पुढील साहित्यप्रवासासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.