Saturday, February 7, 2026
HomeBlogगुलाबी हरभऱ्याने दिलासा, चाफा हरभरा व तुरीचे दर घसरले

गुलाबी हरभऱ्याने दिलासा, चाफा हरभरा व तुरीचे दर घसरले

जळगाव बाजार समितीत हरभऱ्याची नवी आवक; शेतकऱ्यांच्या उत्पन्नात तफावत

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन हरभऱ्याची आवक सुरू झाली असून गुलाबी हरभऱ्याला चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ५ फेब्रुवारी रोजीच्या बाजारभावानुसार गुलाबी हरभऱ्याला हमीभावापेक्षा तब्बल १ हजार ५०० रुपये अधिक दर मिळत आहे. मात्र, दुसरीकडे चाफा हरभऱ्याला हमीभावापेक्षा कमी दर मिळत असून तुरीच्या दरातही मोठी घसरण झाल्याचे चित्र आहे.केंद्र सरकारने हरभऱ्यासाठी ५ हजार ६५० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. मात्र, खासगी बाजारात गुलाबी हरभऱ्याला सध्या ७ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळत आहे. विशेष म्हणजे, मागील आठवड्यात गुलाबी हरभऱ्याचे दर ७ हजार ५०० रुपयांपर्यंत पोहोचले होते. गुरुवारी जळगाव बाजार समितीत गुलाबी हरभऱ्याची १६५ क्विंटल आवक नोंदवण्यात आली.
दरम्यान, बाजारात हरभऱ्याची एकूण मागणी कमी असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. चाफा हरभऱ्याची मात्र सर्वाधिक ६४४ क्विंटल आवक झाली असून त्याला केवळ ५ हजार २७५ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. खासगी बाजारात चाफा हरभऱ्याला हमीभावापेक्षा ३०० ते ४०० रुपये कमी दर मिळत असल्याने, या वाणाची मोठ्या प्रमाणात लागवड करणारे जळगाव जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आहेत.

तूर आणि सोयाबीनची स्थिती

तुरीच्या दरात गेल्या तीन ते चार दिवसांत सुमारे ५०० रुपयांची घसरण झाली असून सध्या तुरीचे भाव ८ हजार रुपयांपर्यंत खाली आले आहेत. तर सोयाबीनचे दर ५ हजार ५०० रुपयांवर स्थिर असून बाजारात सध्या मोठी चढ-उतार दिसून येत नाही.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या