३०० ठरावांना हिरवा कंदील; राज चौधरींचे विकास प्रस्ताव प्रलंबित, अपक्ष नगरसेवकांची नाराजी !
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – भुसावळ नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी तब्बल ३०१ पैकी ३०० विषयांना बहुमताने मंजुरी देण्यात आली, तर एलईडी पथदिव्यांच्या देखभाल-दुरुस्तीचा विषय क्रमांक ३७ एकमताने फेटाळण्यात आला. प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत शहरातील विविध नागरी प्रश्नांवर सत्ताधारी नगरसेवकांनी प्रशासनाची चांगलीच कानउघाडणी केली.
सभेत मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव, उघड्यावर होणारी मांसविक्री, रखडलेली नालेसफाई, दिवसभर सुरू राहणारे पथदिवे, महापुरुषांच्या नावाने असलेल्या उद्यानांची दुरवस्था तसेच घरपट्टी सर्वेक्षणातील त्रुटी यांसारख्या मुद्द्यांवर जोरदार चर्चा झाली. संबंधित विभागांनी तातडीने उपाययोजना करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली.विरोधी पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकांनी सभेच्या एक दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत सभा बेकायदेशीर असल्याचा दावा केला आणि सभेवर बहिष्कार टाकला. त्यामुळे सभा प्रामुख्याने सत्ताधारी सदस्यांच्या उपस्थितीत पार पडली.
नगरसेवक किरण कोलते यांनी महापुरुषांच्या नावाने असलेल्या उद्यानांच्या दुरवस्थेचा प्रश्न उपस्थित करून संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर कारवाईची मागणी केली. गिरीश महाजन यांनी घरपट्टी सर्वेक्षणातील त्रुटींमुळे नागरिकांना आर्थिक फटका बसत असल्याचे निदर्शनास आणले. बबलू बऱ्हाटे यांनी पालिका संकुलातील सार्वजनिक स्वच्छतागृहे दुरुस्त करून ‘पे अँड यूज’ तत्त्वावर सुरू करण्याची सूचना केली.नालेसफाईवर चर्चा करताना नगरसेवक पिंटू कोठारी यांनी नाल्यांमध्ये कचरा व रेती टाकणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. दरवर्षी नालेसफाईवर मोठा खर्च होत असतानाही अपेक्षित परिणाम दिसत नसल्याने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
उघड्यावर सुरू असलेल्या मांसविक्रीमुळे निर्माण होणाऱ्या अस्वच्छतेचा मुद्दाही सभागृहात गाजला. नगरसेविका सोनल महाजन तसेच नगरसेवक गिरीश महाजन, पिंटू कोठारी आणि विशाल नाटकर यांनी मांसविक्रीनंतरचा कचरा नाल्यांमध्ये टाकला जात असल्याने दुर्गंधी आणि आरोग्याच्या समस्या वाढत असल्याचे सांगत तातडीच्या कारवाईची मागणी केली.दिवसभर सुरू राहणाऱ्या पथदिव्यांबाबत प्रशासनाने संबंधित ठिकाणी टायमर प्रणाली बसविण्याचे आश्वासन दिले. प्रभारी मुख्याधिकारी विवेक धांडे यांनी सभेत उपस्थित सर्व मुद्द्यांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले.
सभेत मोकाट जनावरांचा बंदोबस्त, नालेसफाई, महापुरुषांच्या पुतळा परिसरात विद्युत रोषणाई, उड्डाणपुलांना महापुरुषांची नावे, जलकुंभांची दुरुस्ती, पालिका संकुलांचे नूतनीकरण, विविध रस्त्यांचे काँक्रीटीकरण, पेव्हरब्लॉक व सिमेंट बाकांची उभारणी यांसह ३०० विकासकामांच्या ठरावांना मंजुरी देण्यात आली.दरम्यान, सभेला उपस्थित असलेले एकमेव अपक्ष नगरसेवक राज चौधरी यांनी आपल्या प्रभागातील विकासकामांचे कोणतेही प्रस्ताव मंजूर न झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांच्या मते, नागरिकांच्या हिताच्या विकासकामांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले असून याबाबत पुढील भूमिका लवकरच जाहीर केली जाईल.