शैक्षणिक व निवासी सुविधांचा घेतला सविस्तर आढावा
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील जवाहर नवोदय विद्यालयास जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी भेट देऊन विद्यालय परिसर व विविध विभागांची पाहणी केली. यावेळी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या शैक्षणिक व निवासी सुविधांचा सविस्तर आढावा त्यांनी घेतला.
या भेटीदरम्यान शैक्षणिक सुविधा व अध्यापन व्यवस्था, पाणीपुरवठा व स्वच्छता व्यवस्था, क्रीडा साहित्य व क्रीडा सुविधा, प्रयोगशाळा व वाचनालयाची उपलब्धता तसेच विद्यार्थ्यांच्या निवास व दैनंदिन व्यवस्थेची स्थिती यांची पाहणी करण्यात आली.जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी खेळीमेळीच्या वातावरणात संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत माहिती घेतली. तसेच स्पर्धा परीक्षा, करिअर नियोजन व व्यक्तिमत्त्व विकासाबाबत मार्गदर्शन केले. इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना आगामी परीक्षांसाठी शुभेच्छा देत आत्मविश्वासाने यश संपादन करण्यासाठी प्रेरित केले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गुणवत्तापूर्ण व सुरक्षित शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची प्राधान्याची बाब असून, त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सातत्याने राबविण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी नमूद केले.