Friday, April 24, 2026
Homeआरोग्यभुसावळात ९ वर्षांच्या मुलाला मोकाट कुत्र्याचा चावा; रहिवाशांचा नगरपरिषदेला निवेदन !

भुसावळात ९ वर्षांच्या मुलाला मोकाट कुत्र्याचा चावा; रहिवाशांचा नगरपरिषदेला निवेदन !

भुसावळात ९ वर्षांच्या मुलाला मोकाट कुत्र्याचा चावा; रहिवाशांचा नगरपरिषदेला निवेदन !

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – भुसावळ शहरात मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नुकत्याच घडलेल्या एका घटनेने हा प्रश्न आणखी गंभीर केला असून, शहरातील एका वसाहतीतील रहिवाशांनी नगरपरिषदेला निवेदन देत तातडीच्या कारवाईची मागणी केली आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, पहाटे शाळेसाठी घराबाहेर पडलेल्या ९ वर्षांच्या मुलाला मोकाट कुत्र्याने चावा घेतला.या हल्ल्यात मुलाच्या चेहऱ्यावर आणि नाकावर गंभीर जखमा झाल्या असून, त्याला जळगाव येथील शिल्प हॉस्पिटलमध्ये डॉ. श्रीराज महाजन यांच्याकडून उपचार सुरू आहेत. मुलाला प्लास्टिक सर्जरीची गरज असून, त्याचा अंदाजित खर्च १.५ लाख रुपये आहे. या घटनेमुळे मुलाला मानसिक धक्का बसला असून, रहिवाशांमध्ये, विशेषतः पालकांमध्ये चिंता आणि संतापाची लहर उसळली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, मोकाट कुत्र्यांच्या उपस्थितीबाबत यापूर्वीही तक्रारी नोंदवल्या होत्या, पण कोणतीही प्रभावी कारवाई झाली नाही. कुत्र्यांची संख्या वाढत असून, त्यांचे वर्तन धोकादायक झाले आहे. वसाहतीतील पाळीव प्राण्यांच्या मालकांना त्यांच्या प्राण्यांचे नियंत्रण, लसीकरण आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्याची विनंतीही करण्यात आली आहे.

रहिवाशांनी मागणी केली आहे की:

  • आक्रमक मोकाट कुत्र्यांना पकडून स्थीतर करावे.
  • नियमित श्वान नसबंदी मोहिमा राबवाव्यात.
  • भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात.

या निवेदनावर रेखा फिरके, धनश्री लढे, दीपाली शिरसागर, संगीता सरोदे, रूपाली पाटील, ललिता पाटील, निर्मला गायकवाड आणि सोनाली महिंद्र पाटील यांच्या सह्या आहेत. नगरपरिषदेकडून याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या