मोठी ब्रेकिंग : भुसावळ नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांचा अपात्र आदेश जारी !
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – भुसावळमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली असून नगराध्यक्षा गायत्री गौर-भंगाळे यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. राज्य. शासनाने याबाबत अधिकृत आदेश जारी केला आहे.
भुसावळ नगराध्यक्षपद हे अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव होते. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) तर्फे गायत्री गौर-भंगाळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये स्वतःला अनुसूचित जाती प्रवर्गातील असल्याचे प्रमाणपत्र जोडले होते. निवडणुकीत त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार रजनीताई सावकारे यांचा पराभव करत विजय मिळवला होता.निवडणुकीनंतर त्यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत तक्रारी दाखल करण्यात आल्या. त्यानंतर झालेल्या चौकशीत जात पडताळणी समितीने त्यांचे प्रमाणपत्र अवैध ठरवले. या निर्णयानंतर त्यांच्या पदावर संकट निर्माण झाले होते.दरम्यान, २३ एप्रिल रोजी संबंधित प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आले असून त्यानुसार शासनाने भूतलक्षी प्रभावाने त्यांना नगराध्यक्षपदावरून अपात्र घोषित केले आहे. हा आदेश महाराष्ट्र शासनाच्या सहसचिव विद्या हम्पय्या यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे भुसावळच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून पुढील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.