एमआयडीसीत चटई कंपनीला भीषण आग; साहित्यांसह तयार माल खाक
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – औद्योगिक वसाहत परिसरातील डी-८१ सेक्टरमधील सिद्धिविनायक चटई कंपनीला आग लागून कंपनीतील तयार मालासह साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने यात कोणालाही काही दुखापत झाली नाही. मात्र आग एवढी भीषण होती की, आगीचे लोळ व धूर उंच आकाशात जात होते. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. ही घटना रविवारी (२९ डिसेंबर) रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास घडली.
औद्योगिक वसाहत परिसरातील डी-८१ सेक्टरमध्ये उन्मेष चौधरी यांची सिद्धिविनायक नावाने चटई कंपनी आहे. रविवारी रात्री नियमितपणे शिफ्ट सुरू असताना सव्वा अकरा वाजेच्या सुमारास कंपनीमध्ये अचानक आग लागली. ही बाब लक्षात येताच कंपनीतील सर्व कामगारांनी कंपनीच्या बाहेर धाव घेतली. क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले व आग वाढत जाऊन संपूर्ण कंपनीला तिने कवेत घेतले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे तीन बंब व खासगी कंपनीचे फोमचे बंब घटनास्थळी दाखल झाले. याद्वारे रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह पोलिस ताफा पोहोचला व त्यांनी आवश्यक उपाययोजना करीत जमावाला दूर राहण्यास सांगितले.
कंपनीला आग लागताच सर्वजण बाहेर निघाले तसेच घटनेची माहिती मिळतात आजूबाजूच्या नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेतली. आग एवढी भीषण होती की सुरुवातीला जवळ जाण्याची कोणीही हिंमत करत नव्हते. आग लागताच सर्व कामगार बाहेर पडल्याने कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती कंपनीचे मालक उन्मेष चौधरी यांनी दिली.