कुख्यात गुंड मुकेश भालेराव खून प्रकरण : चार संशयितांना अटक !
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहरातील कुख्यात गुंड मुकेश भालेराव याची हत्या करून मृतदेह जमिनीत पुरल्याची खळबळजनक घटना उघडकीस आल्यानंतर, या प्रकरणी सहा जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींमध्ये मयताची पत्नी सुरेखा मुकेश भालेराव हिचाही समावेश आहे. यात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, मुकेश प्रकाश भालेराव (वय ३१) हा भुसावळ शहरातील सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावर तब्बल २६ गुन्हे दाखल होते. या गुन्हेगाराचा १३ मार्च रोजी बेपत्ता झाल्यानंतर शोध सुरू होता. या घटनेनंतर मयताचा भाऊ अविनाश भालेराव याने भुसावळ शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, मनोज राखुंडे, जितू भालेराव, रोहन तायडे, सुरेखा भालेराव हिच्यासह दोन अल्पवयीन तरुणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयाने २६ मार्चपर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.