Thursday, January 29, 2026
Homeक्राईमएमआयडीसीत अवैध दारू अड्ड्यावरून कामगारांवर बेछूट गोळीबार, दोघांची प्रकृती गंभीर !

एमआयडीसीत अवैध दारू अड्ड्यावरून कामगारांवर बेछूट गोळीबार, दोघांची प्रकृती गंभीर !

एमआयडीसीत अवैध दारू अड्ड्यावरून कामगारांवर बेछूट गोळीबार, दोघांची प्रकृती गंभीर !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – जळगाव औद्योगिक वसाहत परिसरात रविवारी अवैध धंद्याच्या वादातून थरार अनुभवायला मिळाला. जी सेक्टरमधील एका प्लास्टिक दाणे बनवणाऱ्या कंपनीबाहेर अवैधरित्या दारू विकणाऱ्या गुंडाने दोन निष्पाप कामगारांवर गावठी पिस्तुलातून ५ ते ६ गोळ्या झाडल्या. या तुफान गोळीबारात राजन शेख रफिउल्ला (वय २०) आणि अहमद फिरोज शेख (वय २६) हे दोन तरुण कामगार गंभीर जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नेमके काय घडले?

किरकोळ वादातून सुरुवात

रात्री उशिरा सरफू शेख नावाचा कामगार कंपनीत नाईट ड्युटीसाठी जात होता. त्यावेळी कंपनीजवळच्या टपरीवर अवैध दारू विक्रेता एका व्यक्तीला मारहाण करत होता. सरफूने ही घटना पाहिली असता, दारू विक्रेत्याने त्यालाही मारहाण करण्यास सुरुवात केली.

मदतीसाठी भावांना बोलावले

मारहाणीनंतर सरफू शेख याने मदतीसाठी आपले भाऊ, राजन आणि अहमद यांना कंपनीबाहेर बोलावले.

बेछूट गोळीबार:

सरफू आणि त्याचे भाऊ आल्यावर दारू विक्रेत्याने त्यांना शिवीगाळ केली. यानंतर तेथे हजर असलेल्या एका महिलेने त्याला गावठी पिस्तूल काढून दिले. पिस्तूल मिळताच आरोपीने संतापाच्या भरात कामगारांवर पाच ते सहा गोळ्या झाडल्या आणि तो फरार झाला.

पोलिसांची तातडीची कारवाई

गोळीबाराच्या या गंभीर घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली. माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. गोळीबाराचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्वतः रात्री उशिरा घटनास्थळी भेट दिली आणि तपासाचा आढावा घेतला. पोलिसांनी जखमींचे जबाब नोंदवून घेत आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके रवाना केली आहेत. अवैध दारू अड्ड्यांवर पोलिसांचा असलेला वचक कमी झाल्याचे या घटनेतून स्पष्ट होत आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या