रेल्वेत नोकरीचे आमिष देवून १३ लाखांची फसवणूक ; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – मुलीला रेल्वेमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत वेळोवेळी पैसे उकळले. त्यानंतर रेल्वेचा बनावट आदेश पाठवून सेवानिवृत्त कर्मचारी गोकूळ युवराज पाटील (वय ६०, रा. पिंप्राळा) यांची १३ लाख रुपयांमध्ये फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. फवणुक करणाऱ्या संजय नथ्थू कोळी (रा. जैनाबाद, जळगाव), राम नारायण नेवाडकर (रा. सिडको, नाशिक) व सतीश गोकूळ पाटील (रा. जुनोने, ता. अमळनेर) या तिघांविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे कि, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून निवृत्त झालेले गोकूळ पाटील यांची मुलगी दीपाली हिचे अभियांत्रिकीचे शिक्षण झाले आहे. तिला नोकरी मिळावी या करीता सेवानिवृत्त कर्मचारी गोकुळ पाटील हे प्रयत्न करीत होते. मार्च २०२३ मध्ये त्यांचे भाऊ मधुकर पाटील यांनी त्यांचे मित्र संजय कोळी याच्याशी भेट घालून दिली. तुमच्या मुलीला नोकरी लावून देण्याविषयी कोळी याने पाटील यांना सांगितले. मात्र त्या करीता १३ लाख रुपये लागतील असे सांगितले. त्यानंतर अमळनेर तालुक्यातील जुनोने येथे राहणारा त्याचा मित्र सतिष पाटील याच्याशी देखील त्याने बोलणे करुन दिले होते. नोकरीच्या कामासाठी सतीश पाटील व गोकूळ पाटील यांनी नाशिक येथे राम नेवाडकर याची भेट घेतली असता त्याने मुलीला भारतीय रेल्वेमध्ये ग्रुप सी या पदावर नोकरीस लावून देण्याचे आमिष दाखविले. नंतर त्यासाठी १३ लाख रुपये देण्यासाठी वेळोवेळी फोन करून पैशाची मागणी केली होती.टपालद्वारे नोकरीची ऑर्डर आल्यानंतर त्यामध्ये दि. ३० जून ते दि. ५ जुलै २०२३ दरम्यान संपूर्ण कागदपत्रांसह मुंबई येथे हजर राहण्याचे कळविण्यात आले. ऑर्डर मिळाल्यानंतर दि. १८ मे २०२३ रोजी सतीश पाटील याच्या खात्यावर पाच लाख व दि. २५ मे २०२३ रोजी मेवाडकर याच्या खात्यावर पाच लाख रुपये पाठविण्यासह सतीश पाटील याला रोख दोन लाख रुपये दिले.
फसवणुक करणाऱ्यांसोबत वेळोवेळी संपर्क साधला असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती. तसेच पैसे परत मागितले असता आज देतो, उद्या देतो, असे सांगू लागले. मात्र रक्कमही परत मिळत नसल्याने गोकूळ पाटील यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून संजय कोळी, राम नेवाडकर, सतीश पाटील या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो. नि. राजेंद्र गुंजाळ करीत आहेत