किराणा व्यापाऱ्याची ९६ हजारांची रोकड चोरट्यांनी लांबविली !
जामनेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील पहूर येथे किराणा व्यापाऱ्याची ९६ हजारांची रोकड चोरट्यांनी लांबविल्याची घटना बसस्थानकापासून जवळच असलेल्या पहूर ते जामनेर रस्त्यावर शनिवारी संध्याकाळी साडेसात ते आठच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पहूर पोलिस ठाण्यात व्यापाऱ्याने धाव घेतली आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, बसस्थानक परिसराला लागून असलेल्या जळगाव ते छत्रपती संभाजीनगर महामार्गालगत मयूर प्रोव्हिजन हे किराणा दुकान आहे. दररोजच्या किराणा मालाच्या विक्रीची रक्कम जामनेर रस्त्याला लागून असलेल्या चंदन कुमावत येथील शॉपिग कॉम्प्लेक्समध्ये वर्धमान स्टील दुकानाचे मालक उज्ज्वल सिसोदिया यांच्याकडे ते जमा करतात. किराणा दुकानातील कर्मचारी कैलास सटाले (३५) हे शनिवारी संध्याकाळी किराणा दुकानाची ९६ हजारांची रक्कम सायकलवरून घेऊन निघाले. तेवढ्यात तीन अज्ञात तरुणांनी दुचाकीवरून येऊन सायकलला किरकोळ धक्का दिला व कैलास सटाले यांच्या हातातील रोकडची बॅग घेऊन जामनेरच्या दिशेने पसार झाले.
माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक भारत दाते, पोलिस कर्मचारी गोपाळ माळी व सागर गायकवाड यांनी धाव घेऊन पाहणी केली आहे. ही सर्व आपबीती कैलास सटाले यांनी ‘लोकमत’ला सांगितली. व्यापारी उज्ज्वल सिसोदिया व कैलास सटाले यांनी पहूर पोलिस ठाण्यात धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते. अधिक तपास पोलिस करत आहेत. मंगळवारी माळी समाज मंगल कार्यालय परिसरातून दुचाकी चोरीची घटना चार दिवसांपूर्वीची असताना ही घटना घडली आहे.