अरुणाचल प्रदेशात भुसावळ तालुक्यातील जवान शहीद !
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील वरणगाव शहरातील सम्राट नगरमधील रहिवासी आणि भारतीय सेनेतील जवान, दहा युनिट महार रेजिमेंटमध्ये नायक पदावर कार्यरत असलेले अर्जुन लक्ष्मण बावस्कर (वय ३५) हे अरुणाचल प्रदेशात देशसेवा करताना शहीद झाले आहेत. अर्जुन यांचे पार्थिव सेना दलाच्या विशेष विमानाने छत्रपती संभाजी नगर येथे २६ रोजी रात्रीपर्यंत पोहोचणार असून २७ रोजी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
अरुणाचल प्रदेश याठिकाणी २४ मार्चला रात्री गस्त घालण्याचे कर्तव्य बजावत असताना दुपारी दिड वाजेच्या सुमारास अर्जुन बावस्कर यांचे हृदयविकाराने निधन झाले. ते कार्य करत असलेल्या ठिकाणी प्राणवायू कमी असतो. प्रथम त्यांना श्वास घेणे कठिण झाले व लागलीच हार्टअटॅक आला. त्या वेळी सोबतच्या जवानांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, काल उशिरापर्यंत जळगावचे जिल्हाधिकारी यांना हा संदेश देण्यात आला. त्यानंतर वरणगाव पोलीस ठाण्यातून संदेश आल्यावर सहाय्यक पोलिस निरीक्षक जनार्दन खंडेराव यांनी हा संदेश शहीद अर्जुनच्या परिवाराला मिळाली होती. या घटनेची बाविस्कर परिवाराला माहिती मिळताच त्यांना मोठा मानसिक धक्का बसला. परिसरातील नागरिकांनी धावत घेत त्यांचे सांत्वन केले. दरम्यान, त्यांच्या पार्थिवावर संपूर्ण लष्करी सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई-वडील, भाऊ व बहीण असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत असून अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. अर्जुन बावस्कर यांचे वडील रेल्वेतून चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून निवृत झाले आहेत. तर भाऊ दीपनगर येथे कार्यरत आहे. अर्जुन बावस्करचे पार्थिव सेना दलाच्या विशेष विमानाने संभाजी नगर येथे बुधवारी रात्रीपर्यंत पोहोचणार आहे.